मायक्रोमॅक्स, इंटेक्सचे अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: January 4, 2018 02:34 PM2018-01-04T14:34:37+5:302018-01-04T14:34:58+5:30
ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून यात आता मायक्रोमॅक्स व इंटेक्स कंपनीचे मॉडेल्स लवकरच बाजारपेठेत दाखल होऊ शकतात.
ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून यात आता मायक्रोमॅक्स व इंटेक्स कंपनीचे मॉडेल्स लवकरच बाजारपेठेत दाखल होऊ शकतात.
गत महिन्यात गुगलने अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) ही प्रणाली सादर केली होती. गुगलने याआधी अँड्रॉइड वन या प्रणालीच्या माध्यमातून किफायतशीर दरातील स्मार्टफोनमध्ये आपल्या अँड्रॉइड प्रणालीची अद्ययावत प्रणाली प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता. प्रारंभी याला खूप मोठे यश लाभेल असे मानले जात होते. तथापि, या प्रयोगाला मर्यादीत प्रमाणात यश लाभले. यामुळे अँड्रॉइड वन प्रणाली मागे पडली. या पार्श्वभूमिवर, अँड्रॉइड ओरिओ या अद्ययावत आवृत्तीला किफायतशीर स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी अँड्रॉइड गो ही स्वतंत्र आवृत्ती सादर करण्यात आली आहे. ही प्रणाली ओरिओ आवृत्तीवरच आधारित आहे. यात ओरिओचे सर्व फिचर्स असतील. यासाठी स्वतंत्र प्ले स्टोअरदेखील असून विविध अॅप्सचा वापर करता येणार आहे. याच्या माध्यमातून अत्यंत किफायतशीर दरातील स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडची अद्ययावत प्रणाली युजर्सला वापरायला मिळेल. यासाठी गुगलने भारतातील काही कंपन्यांशी करार केला आहे. अलीकडेच लाव्हा या कंपनीने अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले होते. यात आता मायक्रोमॅक्स व इंटेक्स कंपनीची भर पडणार आहे. ताज्या वृत्तानुसार या दोन्ही कंपन्या अँड्रॉइड ओ प्रणालीवर चालणारे मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मायक्रोमॅक्सचे आपल्या भारत या मालिकेतील पुढील मॉडेल याच प्रणालीवर आधारित असणार आहे. विशेष बाब म्हणजे याचे मूल्य दोन ते तीन हजार रूपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तसेच कार्बन कंपनीनेही याच प्रकारातील स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे.
भारतात अद्यापही फिचरफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. यावरून स्मार्टफोनच्या दिशेने अपग्रेड होणार्यांसाठी अँड्रॉइड गो प्रणालीवरील हे मॉडेल्स उपयुक्त ठरू शकतात. तर चीनी कंपन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय उत्पादकांना या माध्यमातून नवीन मार्गदेखील मिळू शकतो.