सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. यात आधीदेखील दरात कपात करण्यात आली होती. आता पुन्हा चार हजार रूपयांनी दर घटविल्यामुळे याचे मूल्य आता ५०,९९० रूपये इतके असेल. तर सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे मॉडेल भारतात ६४,९९० रूपये मूल्यात आधी मिळत होते. आता ते ६०,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येईल. तर या स्मार्टफोनच्या सहा जीबी व्हेरियंटचे मूल्यदेखील एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले असून हे मॉडेल आता ग्राहकांना ६४,९९० रूपयात मिळणार आहे. विशेष म्हणजे लाँच झाल्यापासून सॅमसंग गॅलेक्सी एस ८च्या सहा जीबी व्हेरियंटचे मूल्य तब्बल ९ हजारांनी कमी झाले आहे. दरम्यान, या मॉडेल्सला खरेदी करतांना एचडीएफसीच्या ग्राहकांना चार हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरदेखील देण्यात आली आहे.
फिचर्सचा विचार केला असता; सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये बिक्सी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील. हे दोन्ही मॉडेल्स वॉटर आणि डस्टप्रुफ असतील. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. दोन्ही मॉडेल्सची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. यातील एक व्हेरियंट ६ जीबी रॅमयुक्त आहे. यासोबत मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे.
या दोन्ही मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने कुणीही गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेल्सला लॉक/अनलॉक करू शकेल. याशिवाय यात सॅमसंग पास या नावाचे पासवर्ड मॅनेजर अॅप असेल. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे ३००० आणि ३५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्या प्रदान करण्यात आल्या आहेत.