आला नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेट !
By शेखर पाटील | Published: October 6, 2017 06:18 PM2017-10-06T18:18:56+5:302017-10-06T18:19:26+5:30
गुगलने आपल्या डे ड्रीम व्ह्यू या व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
आभासी सत्यता अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अगदी सर्वसामान्यांनाही लाभ घेता यावा म्हणून गुगलने प्रारंभी फक्त कार्डबोर्डच्या मदतीनेच प्राथमिक हेडसेट तयार केला होता. याला उदंड प्रतिसाद लाभला होता. जगभरात विविध कंपन्यांनी यावरून तयार केलेले लक्षावधी हेडसेट विकले गेले असून याची लोकप्रियता अद्यापही अबाधित आहे. यानंतर यातच सुधारणा करून गेल्या वर्षी डे ड्रीम व्ह्यू हा व्हिआर हेडसेट सादर करण्यात आला होता. आता याचीच नवीन आवृत्ती ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
नवीन डे ड्रीम व्ह्यूचे मूल्य ९९ डॉलर्स असून हा हेडसेट १९ ऑक्टोबरपासून ग्राहकांना प्रत्यक्षात मिळणार आहे. यातील बहुतांश फिचर्स हे आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहेत. हा सेटदेखील अतिशय उत्तम दर्जाच्या कापडापासून तयार करण्यात आला आहे. यात आधीच्या मॉडेल्सपेक्षा नवीन रंगांचे पर्याय सादर करण्यात आले आहेत. याच्या सोबत अतिशय उत्तम दर्जाचा कंट्रोलरही प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने या हेडसेटच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन शक्य आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक दर्जेदार ऑप्टीक्स असतील. यामुळे याच्या मदतीने अतिशय उत्तम पध्दतीने आभासी सत्यतेची अनुभुती घेता येणार असल्याचे गुगलने सूचित केले आहे.
हा हेडसेट नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या गुगल पिक्सेल २ आणि गुगल पिक्सेल २ एक्सएल या मॉडेलसह सॅमसंग गॅलेक्सी एस ८, सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस, सॅमसंग गॅलेक्सी नोट ८, असुस झेनफोन एआर, झेडटीई अॅक्झॉन ७, हुआवे मेट ९ प्रो, मोटो झेड/झेड२ आदी स्मार्टफोन्सवर वापरणे शक्य आहे. तर लवकरच अन्य स्मार्टफोन्सवरही हा हेडसेट वापरता येणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे.
पहा: नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेटची माहिती देणारा व्हिडीओ.