आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:06 PM2018-03-25T17:06:24+5:302018-03-25T18:08:53+5:30
सध्या वाय फायचे युग आहे. त्यातच फोर-जी टेक्नॉलॉजी आल्याने जवळपास प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन मिळत आहे. पण आता त्याहीपुढे जात 'लायफाय' टेक्नोलोजी आगामी काळात अधिराज्य करण्याची शक्यता आहे.
पुणे : वायफायमुळे प्रत्येकवेळी डेटा पॅक मारायलाच हवा ही संकल्पना आता दूर झाली आहे. केवळ घरी किंवा कार्यालयात नाही तर आता सार्वजनिक ठिकाणीही मोफत वायफाय सुरु झाले आहे. हे सर्व जरी असले तरी अनेकदा वायफायचा वेग कमी झाल्याने इंटरनेटचाही वेग मंदावतो आणि कामावर परिणाम होतो. पण भविष्यात ही चिंता असणार नाही कारण वायफायच्या जागी वायफाय येणार आहे. लायफाय म्हणजे लाईट फायडेलिटी. हवेच्या माध्यमातून चालणाऱ्या वायफाय ऐवजी प्रकाशाच्या माध्यमातून चालणारे नेटवर्किंग म्हणजे लायफाय. अर्थात हवेच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग अधिक असल्यामुळे यातून नेटवर्किंग सुपरफास्ट होणार आहे.
स्कॉटलॅँडमधील एडिनबर्ग विद्यापीठात संशोधन करणार्या हेरॉल्ड हास यांनी २०११ मध्येच वायफाय नेटवर्क सिद्ध केले होते. या प्रयोगातून त्यांनी एखाद्या मोबाइल फोनच्या टॉवरपेक्षाही जास्त डेटा अत्यंत कमी कालावधीत पाठवून दाखवला. याबाबत काही ठिकाणी अजूनही प्रयोग करणे सुरु आहे. पण असे झाले तर सध्याच्या स्पीडपेक्षा शंभरपट वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. शिवाय राउटर किंवा कोणतीही सामुग्री वापरायची गरज उरणार नाही. दुर्गम भागातही इंटरनेटचे जाळे सहज पसरू शकेल. याबाबत संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी बोलताना हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आले तर सेंकदाला एक चित्रपट डाउनलोड करणे शक्य होणार आहे.अर्थात कोणत्याही दिव्याखाली इंटरनेट मिळणार नसून त्यासाठी दिव्याला विशिष्ट चीप बसवावी लागेल असेही त्यांनी सांगितले. भारतात हे तंत्रज्ञान सध्यातरी कोणी प्रायोगिक स्तरावरही स्वीकारले नसले तरी त्याची जगभरात चाचपणी झाल्यावर भारतातही आगामी काळात अंमलबजावणी होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील काही वर्षांत जगात १४ दशअब्ज एलइडी दिवे असतील असा अंदाज आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लायफाय जोडण्याही होऊ शकतात असेही ते म्हणाले.