एचटीसी कंपनीने आपल्या व्हाईव्ह या व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची बिझनेस एडिशन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
भारतीय युजर्समध्ये व्हीआर अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटी हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे. याची प्राथमिक स्वरूपातील अनुभूती घेण्यासाठी व्हीआर हेडसेटची आवश्यकता असते. बाजारपेठेत सध्या अत्यंत स्वस्त अशा गुगल कार्डबोर्ड व्हीआर हेडसेटपासून ते अनेक प्रिमीयम मॉडेल्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यातील उच्च श्रेणीमध्ये आता एचटीसी कंपनीच्या व्हाईव्ह हेडसेटच्या बिझनेस एडिशनची भर पडली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा हेडसेट प्रोफेशनल्सच्या वापरासाठी तयार करण्यात आला आहे. याचे मूल्य १,२६,९९० रूपये असून हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. या मूल्यात संबंधीत हेडसेटच्या संपूर्ण प्रणालीसोबत १२ महिन्यांच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असणार्या परवाना फीचाही (लायसन्सींगचा) समावेश आहे.
एचटीसी व्हाईव्ह बिझनेस एडिशनमध्ये मूळ हेडसेटपेक्षा अनेक प्रो लेव्हलच्या फिचर्सचा समावेश आहे. यात उत्तम दर्जाचे ओएलईडी डिस्प्ले देण्यात आले आहेत. याला अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणालीची जोड देण्यात आली आहे. यात इन-इयर या प्रकारातील हेडफोन्स आहेत. तसेच या हेडसेटसोबत दोन बेस स्टेशन्स, दोन कंट्रोलर, ३-इन-१ केबल आणि ४ फेस कुशन्स देण्यात आले आहेत.