जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांमध्ये घडी होणार्या स्मार्टफोनबाबत चुरस निर्माण झाली असतानाच आता हुआवे कंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून घडी होणारा स्मार्टफोन हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. या स्पर्धेत अॅपल, सॅमसंग आदींसह अनेक चीनी कंपन्यांनी उडी घेतल्यामुळे याबाबतची चुरस वाढली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस झेडटीई कंपनीने अॅक्झॉन एम हा घडी होणारा जगातील पहिला स्मार्टफोन लाँच करून यात अनपेक्षितपणे आघाडी घेतली.तथापि, यापेक्षा अधिक सुलभपणे ऑपरेट होणारा स्मार्टफोन उत्पादीत करण्याची शर्यत अजून संपलेली नाही. येत्या काही महिन्यांमध्ये अॅपल, सॅमसंग आदी कंपन्या या प्रकारातील मॉडेल सादर करणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच हुआवे या चीनी कंपनीला घडी होणार्या स्मार्टफोनचे पेटंट मिळाले आहे. यामुळे जागतिक पातळीवर तिसर्या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी म्हणून लौकीक असणारी हुआवे यात आघाडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पेटंटच्या माहितीनुसार हुआवेच्या आगामी स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. बंद केल्यानंतर याला एका डिस्प्लेवरून स्मार्टफोन म्हणून वापरता येईल. तर याला उघडले असता मोठा डिस्प्ले तयार होऊन याचा टॅबलेट म्हणून वापर करता येईल. म्हणजेच हे उपकरण बहुपर्यायी असेल. आजवर लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरता येणारी अनेक उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात आली आहेत. मात्र टॅबलेट आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याजोगा स्मार्टफोन हुआवे कंपनी लवकरच सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता हुआवेचा घडी होणारा स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: April 02, 2018 5:00 PM