नवी दिल्ली - ग्रामीण भारतातपोस्ट ऑफिसचं महत्त्व अजूनही खूप मोठं आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस (Post Office) सातत्याने आपलं काम सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. याशिवाय येथे नवनवीन सुविधांचा विस्तारही केला जात आहे. तसेच इंडिया पोस्टने आता एक ट्विट केलं आहे. यामध्ये आपण जवळच्या पोस्ट ऑफिसवर आधार कार्डची (Aadhaar Card) नोंदणी किंवा अपडेशन करू शकता, यासाठी या सुविधेची संपूर्ण यादी प्रत्येक राज्यात उपलब्ध आहे असं म्हटलं आहे.
आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. आता ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत. बायोमेट्रिक तपशील देखील आधार सेवा केंद्रात अद्ययावत केले जातील. आता हे काम पोस्ट ऑफिसमध्ये देखील करता येणार आहे. आपली आधार माहिती अद्ययावत झाल्यास त्याकरिता आपल्याला चार्ज द्यावे लागेल. प्रत्येक वेळी माहिती अद्ययावत केल्यावर याची किंमत 50 रुपये आहे.
आधार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अपडेट करता येते. बहुतेक कामे ऑनलाईन करता येतात. मात्र काही कामांसाठी आधार केंद्रात जाणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक ओळख अद्ययावत करायची असेल तर आधार केंद्रावर जाणे आवश्यक आहे. आपल्याकडे जुना नोंदणीकृत नंबर नसल्यास मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. ओटीपीशिवाय अद्ययावत करण्याची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशा परिस्थितीत, आपल्याकडे मोबाईल नंबर नसल्यास आपण ऑनलाईन काहीही करू शकणार नाही.
जर कोणाचे आधार कार्ड बनले नसेल तर ते पोस्ट ऑफिसमध्ये तयार करता येते. आधार नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणताही चार्ज लागत नाही. नोंदणीच्या वेळी अर्जदाराचा डेमोग्राफिक तपशील तसेच बायोमेट्रिक तपशील देखील आवश्यक आहेत. नावनोंदणीसाठी आधार केंद्रावर जाणे आवश्यक आहे. जर कोणी आंधळा असेल किंवा त्याला बोट नसल्यास आधार सॉफ्टवेअरमध्ये अशा लोकांसाठी नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.