वनप्लस कंपनीने आपल्या वन प्लस ५टी या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची लाव्हा रेड या रंगातील नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
वनप्लस ५टी स्मार्टफोनची लाव्हा रेड आवृत्ती फक्त ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज या व्हेरियंटसाठी सादर करण्यात आली आहे. वनप्लस ५टी या मॉडेलची मध्यंतरी स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन तर अलीकडेच स्टँडस्टोन व्हाईट या आवृत्त्या सादर करण्यात आल्या आहेत. यात आता लाव्हा रेड या आवृत्तीची भर पडणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार या आवृत्तीचा रंग लाल असेल. याचा अपवाद वगळता यात आधीचेच सर्व फिचर्स असतील.
वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये ६.०१ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५डी फुल ऑप्टीक डिस्प्ले आहे. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स सोनी आयएमक्स३९८ सेन्सरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह २० मेगापिक्सल्स सोनी आयएमएक्स३७६के सेन्सरयुक्त देण्यात आला आहे. याच्या मदतीने ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के तर ६० फ्रेम्स प्रति सेकंद गतीने फुल हाय डेफिनेशनचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमएक्स३७१ सेन्सरयुक्त फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग करणे शक्य आहे.
वनप्लस ५टी हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ४.७.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे. तर यात डॅशचार्ज या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची लाव्हा रेड ही आवृत्ती आधीच्याच म्हणजे ३७,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आली आहे.