मुंबई - स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे दूरसंचार क्षेत्रातात अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केलेल्या रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा धमाका केला आहे. रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज 31 मार्चला संपणार होती. त्यामुळं ग्राहकांना ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता. पण काल रात्री रिलायन्स जिओनं प्राईम युजर्ससाठी मोठी घोषणा करत एका वर्षांसाठी मोफत मेंबरशीप जाहिर केली आहे.
पुढील एक वर्षांसाठी अर्थात 31 मार्च 2019 पर्यंत वैधता वाढणार असून प्राइम मेंबरशीपचे सर्व फायदेही मिळणार आहेत. त्यामुळे अनेक आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे या युजर्सना आता पुढील एक वर्षांसाठी प्राईम युजर्सचे सर्व फायदे मिळणार आहेत. याचाच अर्थ जर तुम्ही जिओचे प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला नव्याने ही मेंबरशीप घेण्याची गरज नाही. याअंतर्गत तुम्हाला ज्या ऑफर्स मिळत होत्या त्या अशाच पुढील एक वर्षांसाठी वापरता येणार आहेत. जिओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणादरम्यान युजर्सला ही माहिती दिली. त्याचबरोबर ज्या लोकांनी आजवर जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेली नाही त्यांना यानंतरही 99 रुपयांत प्राइम मेंबरशीप घेता येणार आहेत.