सेनहायझरचा स्मार्ट हेडसेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 02:09 PM2018-03-20T14:09:36+5:302018-03-20T14:09:36+5:30
ध्वनी उपकरणांमधील ख्यातनाम नाव असणार्या सेनहायझर कंपनीने थ्री-डी सराऊंड साऊंडची रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा अॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.
ध्वनी उपकरणांमधील ख्यातनाम नाव असणार्या सेनहायझर कंपनीने थ्री-डी सराऊंड साऊंडची रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा अॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. सध्या ३६० अंशातील छायाचित्रण/चलचित्रीकरण आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी या बाबी लोकप्रिय होत आहेत. या माध्यमातून आपल्या भोवतालाला परिपूर्ण पद्धतीनं अनुभवता येते. याच पद्धतीनं ३६० अंशातील ध्वनी (थ्री-डी सराऊंड साऊंड) देखील अगदी उत्तम श्रवणाची अनुभूती प्रदान करत असतो. मानवी कानाप्रमाणेच चारही बाजूंनी येणारा आवाज आपण या माध्यमातून अनुभवू शकतो. याचा विपुल प्रमाणात वापर सुरू झाला असला तरी सर्वसामान्य युजर्सला याबाबत फार काही माहिती नाही. या पार्श्वभूमिवर, सेनहायझर कंपनीने अॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट ग्राहकांना सादर केला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे याच्या मदतीने कुणीही आपल्या भोवतालचा ध्वनी थ्री-डी सराऊंड साऊंड या प्रकारात रेकॉर्ड करू शकतो.
सेनहायझर अॅमबिओ हे मॉडेल अन्य हेडसेटप्रमाणेच दिसते. मात्र याच्या इयरपीसच्या वरील बाजूस अतिशय उत्तम दर्जाचे आणि सर्व दिशांना फिरू शकणारे मायक्रोफोन देण्यात आले आहेत. याच्या मदतीने संबंधीत युजरच्या भोवतालाचा ध्वनी ३६० अंशात रेकॉर्ड करता येतो. अर्थात यासाठी स्मार्टफोन अटॅच करण्याची आवश्यकता आहे. आणि या स्मार्टफोनवर व्हिडीओ रेकॉर्डींग सुरू केल्यास उत्तम. म्हणजेच यातून सराऊंड साऊंडने युक्त असणारा व्हिडीओ तयार करता येतो. याशिवाय, हा स्मार्ट हेडसेट नियमित इयरफोन म्हणूनही वापरता येणार आहे. तसेच यावरून स्मार्टफोनवर कॉल करता वा रिसीव्ह करता येतील. याच्या सोबत एक कनेक्टर देण्यात आले असून यावरून यातील मायक्रोफोनची लेव्हल कमी/जास्त करता येणार आहे. याच्यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अॅपदेखील तयार करण्यात आले आहे. सध्या सेनहायझरचा अॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट फक्त आयओएस प्रणालीवर वापरता येणार आहे. अर्थात याला आयफोन व आयपॅडला कनेक्ट करता येणार आहे. मात्र लवकरच याला अँड्रॉइडचा सपोर्ट देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हा हेडसेट ग्राहकांना १९,९९० रूपये मूल्यात सेनहायझरच्या संकेतस्थळासह शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आला आहे.