मुंबई : देशाचा अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांनी मांडण्यात येणार आहे. मात्र, त्या आधीच स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन आदी वस्तू महागण्याची बातमी येऊन धडकली आहे. अर्थसंकल्पातही करवाढीची शक्यता असली तरीही महागण्याचे कारण वेगळेच आहे.
भारतात स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन सारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात. हे जरी खरे असले तरीही त्यांचे सुटे भाग हे चीनमध्ये बनतात. चीनमधून आयात केलेल्या याच सुट्या भागांपासून ही उत्पादवे मेक, मेड इन इंडिया म्हणून विकली जातात. चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून तिथे हास्तांदोलन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे तेथून पुरवठा होणारे भाग भारतात किंवा जगभरातही पाठविण्यात येणार नाहीत. यामुळे जगभरात तुटवडा होणार आहे.
मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. टीव्हीसाठीचे सुटे भाग 75 टक्के आणि स्मार्टफोनचे सुटे भाग हे 85 टक्के चीनमधूनच आयात केले जातात. यामध्ये पॅनेल, सर्किट, मेमरी, एलईडी यासारखे पार्ट असतात. तसेच अन्य इलेक्ट्रीक उत्पादनांचे सुटे भागही चीनमधूनच भारतात आणले जातात. यामुळे या वस्तूंच्या किंमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतात सध्या इलेक्ट्रीक कार लाँच होत आहेत. या कारमध्ये वापरली जाणारी बॅटरी किंवा तत्सम सुटे भागही चीनमधूनच भारतीय कंपन्या मागवितात. बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथिअम आयनही चीनच पुरविते. या सगळ्यावर परिणाम होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनच्या कंपन्यांनी स्पेअर पार्टच्या किंमतीमध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ केली आहे. कोरोना नियंत्रित झाला नाही तर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच चीनच्या सरकारने लोकांवर अनेक प्रकारची बंधनेही घातली आहेत. यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना टंचाई जाणवणार आहे.