मुंबईः एखाद्या मोठ्या कंपनीचा नवा स्मार्टफोन आला की, तरुणाईला आपला फोन जुना वाटू लागतो. तो चकाचक फोन, त्यातील 'जबरी' फीचर्स त्यांच्या डोळ्यापुढे तरळू लागतात आणि मग सुरू होतात, हा फोन विकून तो फोन घ्यायचे प्लॅन. तुम्हीही या वर्गात मोडत असाल, तर जुना स्मार्टफोन विकताना 'फॅक्टरी रिसेट'सारखी काय खबरदारी घ्यायची, यासाठीच्या काही टिप्स...
१. स्मार्टफोन विकण्याआधी आपला सगळा डेटा सेव्ह करून बॅकअपला ठेवा. महत्त्वाचे फोन नंबर, मेसेज किंवा फोटो जुन्या फोनमध्ये राहणार नाहीत, याची काळजी घ्या.
२. गुगल अकाउंट साइन-आउट करायला विसरू नका. अन्यथा तुमच्या अकाउंटचा गैरवापर होऊ शकतो आणि त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.
३. सगळी सोशल मीडिया अॅप, व्हॉट्सअॅप आणि मनी ट्रान्सफर अॅप मोबाइलमधून थेट काढून टाका, अनइन्स्टॉल करा.
४. आपण डिलीट केलेला डेटा रिस्टोर करता येऊ शकतो. त्यासाठी बरीच अॅप आणि सॉफ्टवेअर आहेत. तसं आपल्या बाबतीत होऊ नये, यासाठी स्मार्टफोन विकण्याआधी फॅक्टरी रिसेट कराच.
५. फोन ज्या बॉक्समधून आला होता, त्या बॉक्समधूनच - गाईड बुकसोबत तो विकल्यास थोडे जास्त पैसे मिळू शकतात.
६. कंपनी किंवा शो-रूमऐवजी एखाद्या व्यक्तीला फोन विकत असाल तर त्याचा काहीतरी पुरावा, नोंद आपल्यासोबत ठेवा. म्हणजे, भविष्यात कुणी त्या फोनचा गैरवापर केला, तरी आपण संकटात सापडणार नाही.
७. फोन विकायला जाताना, त्या फोनची बाजारातील किंमत माहिती करून घ्या, अन्यथा तुम्ही फसवले जाऊ शकता.