हुआवेची शाखा असणार्या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे. यातील मीडियापॅड टी ३ हा टॅबलेट १२९९९ रूपये मूल्यात तर मीडियापॅड टी ३ १० या मॉडेलचे २ आणि ३ जीबी रॅमचे व्हेरियंट अनुक्रमे १४,९९९ आणि १६,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहेत. हे दोन्ही टॅबलेट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. हे दोन्ही टॅबलेट क्वॉलकामॅच्या क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरवर चालणारे आहेत. दोन्हींमधील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हे दोन्ही मॉडेल अँड्रॉडइच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा एमआययुआय ५.१ हा युजर इंटरफेस असेल. तर यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हे दोन्ही टॅबलेट फोर-जी एलटीई नेटवर्क कनेक्टीव्हिटीने सज्ज आहे. तसेच यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी आदी फिचर्स दिलेले आहेत. यात सिंगल सीमकार्डचा सपोर्ट असेल.
मीडियापॅड टी ३ या मॉडेलमध्ये आठ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
दरम्यान, मीडियापॅड टी ३ १० या मॉडेलमध्ये ९.६ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्सचा म्हणजेच एचडी डिस्प्ले असेल. याची रॅम २/३ जीबी आणि १६/३२ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल.