नवी दिल्ली - गेल्या वर्षी फेब्रुवारीत Google आणि WhatsApp ची जोरदार चर्चा सुरू झाली होती. काही पब्लिक ग्रुप हे गुगल सर्चच्या रिझल्टमध्ये दिसत असल्याची त्याची चर्चा रंगली होती. या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅट आणि मेंबर इन्फो ही गुगल सर्चमध्ये पाहिली गेली होती. मात्र ही समस्या त्यानंतर दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.
युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. जर कोणाकडे व्हॉट्सअॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून जॉइन करू शकतात. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगलवर सर्च करून पाहिल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
जवळपास 1500 ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत. एक्सपर्टने फेसबुकची मालकी असलेलं इंस्टेंट मेसेंजर अॅप chat.whatsapp.com सबडोमेनसाठी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. कंपनी सर्च क्रॉलर्सला कॉन्टेन्ट इंडेक्स करण्यापासून रोखण्यासाठी robots.txt चा वापर करते असं सांगितलं आहे
युजरचं प्रोफाईल पाहिल्यास गुगलने युजर्सचं प्रायव्हेट अकाउंट दाखवणं सुरू केलं आहे. यात युजर्सची प्रोफाईल इमेज आणि त्याच्या नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाईल पाहू शकतात. रिपोर्टनुसार, जवळपास 5000 प्रोफाईल आता सार्वजनिक आहेत. राजहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप या ठिकाणी robots.txt फाईलचा वापर करत नाही. सध्या व्हॉट्सअॅप आणि गुगलने यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप एर्दोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अॅप असणाऱ्या व्हॉट्सअॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी 11 जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअॅप ग्रूप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असणाऱ्या BiP वर ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अॅप आहे. अॅपची मालकी तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या तुर्कीमधील कंपनीकडेच आहे. तुर्कीमध्ये आता या बीप अॅपवरुनच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना दिल्या जाणार आहेत.