नवी दिल्ली : अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी मिनिटाला 6 पैसे एफयुपी द्यावी लागत असल्याने हा पैसा ग्राहकांच्या खिशातून काढण्य़ाचा निर्णय टेलिकॉम कंपन्यांच्याच अंगलट येऊ लागला आहे. यामुळे टेरिफ वाढविणाऱ्या कंपन्यांनी ग्राहक टिकविण्यासाठी पुन्हा अनलिमिटेड कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन-आयडियाने ही माहिती दिली आहे.
या आधी एअरटेलने एफयुपी हटविण्याची घोषणा केली होती. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किंमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
जिओ अन्य नेटवर्कवर कॉल करताना रिंग वाजण्याचा कालावधी कमी करत असल्याचा आरोप एअरटेल, व्होडाफोनने केला होता. तर जिओने हे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार असल्याचे म्हटले होते. असे केल्याने अन्य नेटवर्कच्या ग्राहकांना मिसक़ॉल जात होता. यामुळे त्या ग्राहकांनी जिओला फोन केल्याने या कंपन्यांना जिओला 6 पैसे एफयूपी द्यावी लागत होती.
या वादमुळे कंपन्यांनी रिचार्जची रक्कम वाढविण्याबरोबरच अन्य नेटवर्कसाठी लिमिटही दिले होते. व्होडाफोनने 28 दिवसांच्या रिचार्जसाठी 1000 मिनिट दिले होते. तर 84 दिवसांच्या रिचार्जसाठी 3000 मिनिटे देण्यात आली होती. जर 28 दिवसांचा ग्राहक रोज अन्य नेटवर्कवर एक तास बोलत असेल तर त्याची ही लिमिट 16 दिवसांतच संपणार होती. असे झाले असते तर हे प्लॅन्स महागडे ठरत होते. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. तुलनेत जिओचे प्लान स्वस्त होते, यामुळे आधीच ग्राहक गमावलेल्या कंपन्यांना हे परवडणार नव्हते.
यामुळे एअरटेलनंतर व्होडाफोनने अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.