नवी दिल्ली : WhatsApp ने अलीकडेच नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यावर जागतिक स्तरावरून टीका केली जात आहे. जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह दिग्गज व्यक्तींनी व्हॉट्सअॅपला रामराम ठोकत नवीन पर्याय शोधले आहेत. या पार्श्वभूमीवर WhatsApp कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
WhatsApp कडून युझर्सच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप युझर्सचा कोणताही डेटा किंवा मेसेजेस फेसबुकसोबत शेअर केले जात नाही. नवीन पॉलिसी अपडेट केली, तरी कुटुंब किंवा मित्रांसोबत केलेल्या मेसेजेसची प्रायव्हसी प्रभावित होत नाही, असा दावा व्हॉट्सअॅपकडून करण्यात आला आहे.
WhatsApp कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसी ही व्यवसायाला समोर ठेवून तयार करण्यात आली आहे आणि ही पॉलिसी ऑप्शनल आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून डेटा कसा जमवला जातो आणि त्याचा वापर केला जातो, याची विस्तृत माहिती व्हॉट्सअॅला अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी ही पॉलिसी आणली आहे, असे व्हॉट्सअॅपकडून सांगितले गेले आहे. लोकेशन डेटा, कॉल लॉग्स आणि ग्रुप यांविषयीही व्हॉट्सअॅपने सखोल स्पष्टीकरण दिले आहे.
WhatsApp कोणत्याही युझर्सचे मेसेजेस पाहू शकत नाही किंवा केलेल्या कॉल्समधील संभाषण ऐकू शकत नाही. इतकेच नव्हे, तर फेसबुकमध्येही अशीच यंत्रणा राबवली गेली आहे. युझर्सकडून करण्यात आलेले मेसेजेस किंवा कॉल यांचा डेटा व्हॉट्सअॅपकडे जमा केला जात नाही. एवढेच नाही, तर शेअर केलेले लोकेशनही पाहू शकत नाही. फेसबुकही नाही, असेही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.
WhatsApp युझरचे कोणतेही कॉन्टॅक्ट फेसबुकसोबत शेअर केले जात नाही. मेसेजिंग प्रोसेस गतिमान करण्यासाठी केवळ मोबाइल क्रमांक अॅक्सेस केले जातात. व्हॉट्सअॅपवरील सर्व डेटा हा एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड असतो. तो वापरकर्त्यांशिवाय कोणीही पाहू शकत नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप युझर डिसअॅपियरिंग मेसेज सेट करू शकतात. यामुळे मेसेज पाठवल्यानंतर तो काही वेळाने डिसअॅपियर होईल, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.