मुंबई : लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपलं मेसेज डिलीट करण्याचं फिचर 'Delete For Everyone' हे अपडेट करण्याच्य तयारीत आहे. या अपडेटनंतर तुम्हाला जवळपास एका तासानंतरही पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. सध्या या फिचरची व्हॉट्सअॅपकडून टेस्टिंग सुरू आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे फिचर केवळ बीटा व्हर्जन 2.18.69 साठी जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे याचा वापर कऱण्यासाठी सामान्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, पण लवकरच हे फिचर सर्वांसाठी सुरू होऊ शकतं. नव्या अपडेटनंतर तुम्ही पाठवलेला मेसेज 4096 सेकंद म्हणजेच 68 मिनिट आणि 16 सेकंदांनंतरही डिलीट करू शकाल. सध्या मेसेज डिलीट करण्यासाठी केवळ 420 सेकंद म्हणजे 7 मिनिटांचा वेळ आहे. व्हॉट्सअॅप लवकरच मेसेज लॉकिंग अपडेट देखील आणणार असल्याची माहिती आहे.
व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी मेसेज डिलीट करण्यासाठी एक नवं फिचर आणलं. आतापर्यंत हे फिचर मेसेज पाठवण्याच्या केवळ सात मिनिटांमध्येच वापरता येतं. मेसेज डिलीट करण्यासाठी देण्यात आलेली सात मिनिटांची वेळ खूप कमी आहे अशी तक्रार अनेक युझर्सनी केली होती. त्यामुळे जर व्हॉट्सअॅपने नवं अपडेट जारी केलं तर युझर्सची ही तक्रार दूर होईल आणि मेसेज डिलीट करण्यासाठी तुम्हाला तासाभराचा वेळ मिळणार आहे.