शाओमीने मी गेमिंग लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
शाओमीने आधीच आपल्या उत्पादनांमध्ये वैविध्यता आणली आहे. या अनुषंगाने शाओमीने अलीकडे लॅपटॉपची नवीन मालिका बाजारपेठेत उतारली आहे. तथापि, आता शाओमीने प्रथमच गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे. गेमिंगच्या उत्तम अनुभूतीसाठी दर्जेदार डिस्प्ले, गतीमान प्रोसेसर आणि अर्थातच चांगल्या ध्वनी प्रणालीची आवश्यकता असते. मी गेमिंग लॅपटॉपमध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात १७८ अंशाचा व्ह्यू अँगल प्रदान करण्यात आला आहे. यात सातव्या पिढीतील इंटेलचे कोअर आय ५ आणि आय ७ या प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. याला ६ जीबी डीडीआर ५ एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स २०६० या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यात ८ व १६ जीबी रॅमचे पर्याय आहेत. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टेराबाईट असे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये खास गेमर्सच्या सुविधेसाठी विकसित करण्यात आलेला कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. यावर गेमिंगमध्ये महत्वाच्या मानल्या जाणार्या पाच बाबींसाठी स्वतंत्र की देण्यात आल्या आहेत. यामुळे अर्थातच गेमर्सला सुविधा मिळणार आहे.
शाओमीच्या मी गेमिंग लॅपटॉपमध्ये कनेक्टीव्हिटीसाठी १ एचडीएमआय पोर्ट, ४ युएसबी ३.० पोर्ट, १ युएसबी टाईप-सी पोर्ट, १ इथरनेट पोर्ट, एसडी/एसडीएचसी/एसडीएक्ससी असे ३-इन-१ कार्ड रीडर, वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. यात डॉल्बी अॅटमॉस ही अतिशय उच्च दर्जाची ध्वनी प्रणाली दिलेली आहे. कोणताही गेमिंग लॅपटॉप हा लवकर तापत असतो. यामुळे याचे अंतर्गत तापमान वाढू नये म्हणून यामध्ये अभिनव प्रणाली देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत यामध्ये टोर्नेडे हे बटन असून ते दाबल्या नंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये यातील तापमान ३ ते ५ अंशापर्यंत कमी होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा गेमिंग लॅपटॉप विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असून यात ५५ वॅट प्रति-तास क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पहिल्यांदा हा लॅपटॉप चीनमध्ये मिळणार असून हे मॉडेल लवकरच भारतात लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.