शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या मॉडेलचे ३२ जीबी स्टोअरेज असणारी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हे मॉडेल ६४ जीबी रॅमच्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले होते. याचे मूल्य १६९९९ रूपये इतके होते. आता यातील सर्व फिचर्स समान ठेवत ६४ ऐवजी ३२ जीबी स्टोअरेज असणारी आवृत्ती १२,९९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. शाओमी मी मॅक्स २ हा फॅब्लेट असून यात ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.
शाओमी मी मॅक्स २ या स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्शन ऑटो-फोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. यात सोनी कंपनीचा आयएमएक्स ३८६ हा इमेज प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात तब्बल ५३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवसांपर्यंत चालू शकणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला क्वॉलकॉमच्या क्विक चार्ज ३.० तंत्रज्ञानाचा सपोर्ट असून ही बॅटरी एका तासात ६८ टक्के इतकी चार्ज करणे शक्य असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
शाओमी मी मॅक्स २ हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर आधारित एमआययुआय या प्रणालीवर चालणारे असून यात लवकरच नोगट आवृत्तीचे अपडेट देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या ड्युअल सीमयुक्त स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.