युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिकचा होणार विलय
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 06:37 PM2017-07-28T18:37:44+5:302017-07-28T18:38:10+5:30
गुगल कंपनीने आपल्या युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिक या दोन प्रिमीयम सेवांचा विलय करून एकच नवीन स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
युट्युब साईटवरील बर्याच व्हिडीओजमध्ये जाहिराती येत असतात. काही व्हिडीओजच्या प्रारंभी तर काहींच्या मध्ये यांचा समावेश करण्यात आलेला असतो. मात्र अनेकांना जाहिरातींचा व्यत्यय नकोसा वाटतो. यामुळे युट्युब साईटवर आता ‘युट्युब रेड’ नावाची सेवा सुरू करण्यात आली होती. याच्या अंतर्गत दरमहा ९.९९ डॉलर्स भरल्यानंतर या साईटवरील कोणताही व्हिडीओ जाहिरातींविना पाहता येतात. याशिवाय या सेवेचा उपयोग करून कुणीही कोणताही व्हिडीओ डाऊनलोड करून आपल्या व्हिडीओवर नंतर ‘ऑफलाईन’ पध्दतीने पाहू शकतो. तसेच स्मार्टफोनवर कोणतेही अॅप सुरू असतांनाही युट्युब साईटवरील व्हिडीओचा त्या युजरला आनंद लुटता येतो. एवढेच नव्हे तर एकदा का ही सेवा कार्यान्वित केली तर त्या युजरला ‘गुगल प्ले म्युझिक’च्या प्रिमीयम सेवेसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. अर्थात युट्युब साईटवर जे व्हिडीओज आधीच ‘पे-पर-व्ह्यु’ या पध्दतीने सशुल्क उपलब्ध आहेत (उदा. नवीन सिनमा वगैरे) त्यांचे मुल्य मात्र त्या युजरला मोजावे लागणार आहे. ‘युट्युब रेड’ ही सेवा अद्याप भारतात सादर करण्यात आलेली नाही.
तर दुसरीकडे गुगल कंपनीने आपली गुगल प्ले म्युझिक ही संगीतविषयक प्रिमीयम सेवा भारतात काही महिन्यांपुर्वीच लाँच केली आहे. गुगल प्ले म्युझिकवर संगीताचा अजस्त्र साठा आहे. जगभरातल्या विविध भाषांमधील तब्बल चार कोटींपेक्षा गाणी आणि अल्बम्सचा साठा यावर आहे. कुणीही याचा अगदी अल्पदरात आनंद घेऊ शकते. ही सेवा लाँच करतांना गुगल कंपनीने काही सवलती दिल्या होत्या. आता मात्र प्रत्येक महिन्याला ९९ रूपयांची आकारणी करून ही सेवा घेता येते. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसह डेस्कटॉपवरूनही युजर्स या सेवेचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे संबंधीत युजर आपल्या प्ले-लिस्टमध्ये तब्बल ५० हजार गाणी मोफत अपलोड करू शकतात. यासोबत गुगलची रेडिओ सेवादेखील मोफत ऐकता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे यात ऑफलाईन सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे कुणीही युजर आपल्याला हवे ते गाणे ऑफलाईन असतांनाही ऐकू शकतो.
दरम्यान, युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिक या सेवांना एकत्र करण्यात येणार असून याबाबत ‘व्हर्ज’ या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे युट्युबच्या हेड ऑफ म्युझिक या जबाबदार पदावर असणार्या लॉयर कोहेन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यानुसार या दोन्ही सेवांचा विलय करून एकच स्ट्रीमिंग सेवा सुरू केली जाईल. तोवर या दोन्ही सेवांचा विद्यमान ग्राहकांना वापर करणे शक्य असून नवीन सेवेवर शिफ्ट होण्यासाठी त्यांना योग्य वेळी सूचना देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात गुगल कंपनीची ही नवीन सेवा अॅपल म्युझिक आणि स्पॉटीफॉय यांच्यासाठी धोक्याची सूचना असेल असे मानले जात आहे.