वॉशिंग्टन: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ यावर जगभरातून आक्षेप नोंदवण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर सोशल मीडियासंदर्भात अनेक चर्चा झडल्या. युट्यूब, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, इन्स्टाग्राम यांनी आक्षेपार्ह आणि हिंसेला प्रोत्साहन तसेच चिथावणी देणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ हटवले. आता मात्र, YouTube ने केलेल्या कारवाईची मोठी माहिती समोर आली आहे. युट्यूबने ८.३० कोटी व्हिडिओ आणि ७०० कोटी कमेंट्स हटवल्याचे समजते. (youtube took big action)
सन २०१८ पासून ते आतापर्यंत एक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, युट्यूबने ८.३० कोटी व्हिडिओ हटवले आहेत. हे सर्व व्हिडिओ आक्षेपार्ह, कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केलेले आणि पोनोग्राफी संबंधित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच यासह ७०० कोटी कमेंट्सही हटवल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक १० हजारांपैकी १६ ते १८ व्हिडिओ आक्षेपार्ह असतात, असे युट्यूबकडून सांगण्यात आले आहे.
आर्टिफिशियल यंत्रणा महत्त्वाची
युट्यूबचे सुरक्षा आणि विश्वसनीय टीमचे संचालक जेनिफर ओ'कॉनर यांनी सांगितले की, युट्यूबकडून राबवली जाणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा महत्त्वाची आहे. कारण ही यंत्रणा प्राथमिक पातळीवरच ९४ टक्के आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करते, हटवते. याशिवायही काही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा कमेंट्स राहतात. आक्षेपार्ह व्हिडिओंची संख्या कमी होत असली, तरी हा महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. यापूर्वी प्रति १० हजारांपैकी ६३ ते ७२ व्हिडिओ आक्षेपार्ह असत, अशी माहिती त्यांनी दिली.
अमेरिकेत १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा
फेसबुक डाटा लीकची आयरलँडमधून तपास
भारतातील ६१ लाख आणि जागतिक स्तरावरील ५३.३ कोटी युझर्सचा फेसबुक डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती अलीकडेच समोर आली होती. या लीक प्रकरणाची आता आयरलँडमधूनही चौकशी केली जाणार आहे. तसेच फेसबुकच्या दाव्याची समीक्षा केली जाणार आहे. कारण याचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) युझर्सच्या डेटा सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, युझर्सचा गोपनीय डेटा सार्वजनिक झाला आहे. रिपोर्टनुसार यामध्ये युझर्सचे फोन क्रमांक, ईमेल यांसह खासगी माहितीचा समावेश आहे.