कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे आज निधन झाले आहे. १० ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल ४० दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर आज बुधवारी (ता. २१ सप्टेंबर) संपली आहे. राजू श्रीवास्तव गजोधर भैय्या या नावाने ओळखले जात होते. आणि आता त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव यांनी यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला होता.
राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव त्यांच्या गजोधर स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहेत. ते म्हणताना दिसत आहेत की, “नमस्कार, काही नाही, निवांत बसलोय. आयुष्यात असं काम कर की यमराज आला तरी तुम्हाला न्यायला तर तो म्हणाला पाहिजे, भाऊ तुम्ही रेड्यावर बसा. तुम्ही चालत आहात, हे योग्य दिसत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात.” आता त्यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
१० ऑगस्टला जीममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
गेल्या ४० दिवसांपासून ते बेशुद्ध होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे विनोदी जगतासह सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.