अर्जुन पुरस्कारानंतर आता ‘खेलरत्न’वर नजर : बोपन्ना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:01 AM2018-09-24T02:01:58+5:302018-09-24T02:02:16+5:30
भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
नवी दिल्ली - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
विशेष असे की ३८ वर्षांच्या रोहणच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी देखील करण्यात आली होती, पण जकार्ता येथील आशियाई स्पर्धेचे दुहेरीत सुवर्ण विजेत्या या खेळाडूची अर्जुन पुरस्कारावर बोळवण करण्यात आली. २५ सप्टेंबर रोजी राष्टÑपती भवनात पुरस्कार वितरण होणार आहे. बोपन्ना पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वत: राष्ट्रपती भवनात उपस्थित राहू शकणार नाही. त्यावेळी तो चीनमधील चेंगदू ओपन स्पर्धेत खेळत असेल.
अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद बोपन्नाच्या चेहऱ्यावर झळकत होता. तो म्हणाला,‘ अर्जुन पुरस्कारासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. तरीही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात राष्ट्रीय पुरस्काराचे विशेष महत्त्व असते.’
रोहणसाठी मागचे सत्र अतिशय निराशादायी ठरले. यावर तो म्हणतो,‘होय, मागच्या वर्षी माझी पुरस्कारासाठी निवड झाली नाही. यामुळे फार दुखावलो होतो. यंदा माझा विचार झालाच. कामगिरीत आणखी भर घालण्यासाठी मी झटणार आहे. कामगिरीच्या बळावर मला खेलरत्न मिळवायचा आहे. यानंतर माझे टार्गेट ‘खेलरत्न’ असेल.(वृत्तसंस्था)