अॅश्ले बार्टीचे आव्हान आले संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 05:12 AM2019-07-09T05:12:16+5:302019-07-09T05:12:45+5:30
विम्बल्डन ओपन : बिगरमानांकित रिस्के खळबळजनक विजयासह उपांत्यपूर्व फेरीत
लंडन : महिला गटातील अव्वल टेनिसपटू खेळाडू अॅश्ले बार्टी हिचे सेरेना विल्यम्सप्रमाणे एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न सोमवारी भंगले. विम्बल्डन ओपन स्पर्धेत तिच्यावर खळबळजनक विजय मिळवून अमेरिकेच्या बिगर मानांकित अॅलिसन रिस्के हिने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
जागतिक टेनिस क्रमवारीत आणि स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या बार्टीला रिस्केने ३-६, ६-२, ६-३ असे नमवून स्पर्धेबाहेर केले. ही लढत १ तास ३६ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत ५५व्या क्रमांकावर असलेल्या रिस्केची कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर २३ वर्षीय बार्टीने सामन्यावरील पकड गमावली. याचा पूरेपूर फायदा उचलत रिस्केने सामन्यात पुनरागमन केले. या २९ वर्षीय खेळाडूने नंतरचे दोन्ही सेट आरामात जिंकून कारकिदीर्तील सर्वांत मोठा विजय नोंदविला. यंदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी बार्टी विम्बल्डमध्येही जेतेपद पटकाविण्याच्या इराद्यानेच उतरली होती. २०१५ मध्ये सेरेनाने या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. तिच्या कामगिरीशी बरोबरी साधण्याचे बार्टीचे स्वप्न रिस्केच्या अफलातून खेळामुळे धुळीस मिळाले. उपांत्यपूर्व फेरीत रिस्केसमोर आपल्याच देशाची दिग्गज व ७ वेळची विम्बल्डन विजेती सेरेना विल्यम्सचे तगडे आव्हान असेल. ११व्या मानांकित सेरेनाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नावारोचा ६-२, ६-२ ने सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने २४व्या मानांकित क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिक हिच्यावर ६-४, ६-२ने विजय मिळविला. युक्रेनची प्रतिभावान खेळाडू दयाना यास्त्रेमस्का हिची घोडदौड ६-४, १-६, ६-२ने रोखून चीनच्या ३० वर्षीय शुआई झांग हिनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पुरुष गटामध्ये स्पेनच्या दिग्गज राफेल नदालने आपली विजयी घोडदौड कायम राखताना पोर्तुगालच्या जोओ सोसा याचा ६-२, ६-२, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला. दुसरीकडे, अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचनेही फ्रान्सच्या उगो हम्बर्टचा ६-३, ६२, ६-३ असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. (वृत्तसंस्था)
विम्बल्डननंतर रिस्के-स्टीफन अमृतराज विवाहबंधनात!
२९ वर्षीय रिस्के आणि भारताचे माजी दिग्गज टेनिसपटू आनंद अमृतराज यांचा मुलगा स्टीफन अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ही स्पर्धा आटोपल्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. स्टीफनने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये काही काळ भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, यात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. अमेरिकेत स्थायिक झालेला ३५ वर्षीय स्टीफन टेनिस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
पहिला सेट गमावल्यानंतरही आक्रमक खेळ करून जगातील अव्वल खेळाडूविरूद्ध जिंकल्यामुळे मी स्वत:च्या खेळावर समाधानी आहे. ग्रास कोर्टवर खेळायला मला नेहमीच आवडते. इतर कोर्टवरही अशी कामगिरी करायला आवडेल.
- अॅलिसन रिस्के, अमेरिका