पालेमबांग : भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस प्रकारात गुरुवारी कांस्यपदकाची कमाई केलीआहे. उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या ज्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना -दिविज शरण या बलाढ्य भारतीय जोडीने अंतिम फेरीट धडक मारली आहे.दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या सामन्यात शुईने रैनावर ४-६, ७-६(६) अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आशियाडच्या महिला टेनिस प्रकारात एकेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद सानिया मिर्झाच्या नावावर आहे. दोहा येथील २००६ च्या स्पर्धेत तिने रौप्य जिंकले होते. त्यानंतर ग्वांग्झू येथे २०१० मध्ये सानियाने पुन्हा कांस्य जिंकले. गुरुवारी कांस्य पदक पटकावत २५ वर्षांची अंकिता आशियाई स्पर्धा महिला एकेरीत पदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली.दुसरीकडे, पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत दाखल झाली. अटीतटीच्या रंगलेल्या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित झाले आहे. (वृत्तसंस्था)कठोर मेहनतीचे फळ : गेली १२ वर्ष अंकिताने कठोर मेहनत घेतली आहे. मध्यमवर्गातून आलेल्या अंकिताने खरच कौतुकास्पद खेळ केला. तिच्या खेळात खूपच सुधारणा झालेली आहे. गेली सहा महिने पीवासीच्या मैदानावर आम्ही तिच्या सर्व्हिस, ग्राऊंड स्ट्रोकवर लक्ष देत होतो. तिच्या बॅकहॅण्ड फटक्यांचा वेग वाढविण्यावरही आम्ही भर दिला होता. आधीपासून जिद्दी असलेल्या रैनाने आजच्या खेळात कोणतीही कसर सोडली नाही. तिने १२ वर्ष ज्या चिकाटीने मेहनत घेतली, त्याचे योग्य फळ तिला मिळाले आहे.- हेमंत बेंद्रे (अंकिताचे मार्गदर्शक)युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक : अंकिताने कांस्यपदक जिंकल्याने महाराष्टÑातील विविध वयोगटातील टेनिसपटूंना नक्कीच प्रोत्सहान मिळेल. हे पदक म्हणजे तीची चिकाटी, जिद्द आणि तीने गेली १२ वर्ष घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. मुळची अहमदाबादची असलेली अंकिता वयाच्या ११ व्या वर्षी पुण्यात १४ वर्षाखालील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला वाईल्ड कार्ड देण्यात आले होते. तेव्हा तिने पुण्यात सरावासाठी येण्यासंबंधी विचारणा केली होती. त्यावेळी अंकिताची टेनिस खेळण्यासाठी पाहीलेली तळमळ आठवते. तेव्हापासून गेली १२ वर्ष ती पुण्यात हेमंत ब्रेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. - सुंदर अय्यर (अंकिताचे मेंटॉर)
Asian Games 2018: अंकिता रैनाला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 5:54 AM