- बाळकृष्ण परबआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला काही खेळांमध्ये लक्षणीय यश मिळाले. मात्र काही खेळांमध्ये आधीच्या स्पर्धांमधील कामगिरीची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. अशाच खेळांपैकी एक खेळ म्हणजे टेनिस.टेनिसमध्ये भारताला एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह तीन पदकांवर समाधान मानावे लागले. रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुष एकेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन आणि महिला एकेरीत अंकिता रैनाने कांस्यपदक पटकावले.
गेल्या चार-पाच आशियाई क्रीडा स्पर्धांचा विचार केल्यास भारताची या स्पर्धेतील पदकांच्यादृष्टीने ही सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मात्र असे असले तरी यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारतीय टेनिसपटूंनी केलेल्या कामगिरीला कमी लेखून चालणारे नाही. त्यांनी ज्या परिस्थितीत यश मिळवले त्याचे कौतुकच व्हायला हवे.
भारतात बऱ्यापैकी रुजलेल्या खेळांमध्ये टेनिसचा समावेश होतो. त्यात लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या खेळाडूंमुळे भारतात टेनिसला ग्लॅमरही मिळाले. मात्र खेळांडूंचा अहंकार, आपापसातील हेवेदावे यामुळे भारतातील टेनिसची वाढ खुंटलीय. जे प्रस्थापित आहेत त्यांना नव्या खेळाडूंसोबत खेळण्यात कमीपणा वाटतोय. यावेळीही दुहेरीत रामकुमार रामनाथनसोबत खेळावे लागेल म्हणून पेसने माघार घेतली. सानियाच्या अनुपस्थितीमुळे महिला गटातही बाजू लंगडीच होती. बोपण्णा सोडला तर अनुभवी असा कुणी नव्हताच.
अशा परिस्थितीत टेनिसमधून पदकांची अपेक्षा करणे थोडे कठीणच होते. पण युवा खेळाडूंनी अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी केली. पुरुष दुहेरीत बोपण्णाला शरणने सुरेख साथ दिली. त्यामुळे टेनिसमधील सुवर्णपदकांची परंपरा कायम राखणे शक्य झाले. पुरुष दुहेरीतील या सुवर्णाएवढीच एकेरीत गुणेश्वरन आणि अंकिता यांनी पटकावलेली कांस्यपदके मौल्यवान आहेत. विशेषतः अंकिता रैनाची कामगिरी अपेक्षा उंचावणारी आहे. तिने महिला एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलीच, पण मिश्र दुहेरीतही अनुभवी बोपण्णासोबत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. पुरुष दुहेतही रामनाथन आणि सुमित नागल यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. भारतीय टेनिस सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. अशावेळी युवा टेनिसपटूंनी केलेला खेळ भविष्यातील स्पर्धांसाठी अपेक्षा उंचावणारा आहे.