मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातं हे जगजाहीर आहे. त्यामुळे हे पक्के शेजारी कोठेही भेटले की तणावाचं वातावरणं निर्माण झालंच म्हणून समजा. पण, जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले. भारताची रोहन बोपण्णा आणि दिविज शरण ही जोडी सुवर्णपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या जोडीचा सामना करत होती त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या विजयासाठी चिअर करत होते.
या स्पर्धेत उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या खेळाडूंनी एकत्र पथसंचलन करून जगाला शांततेचा संदेश दिला. त्याच पार्श्वभुमीवर बोपण्णा-शरण यांच्या विजयासाठी चिअर करणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंचे कौतुक करायला हवे. टेनिस पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा- दिविज शरण जोडीनं कझाकिस्तानच्या कझाकिस्तानच्या एलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येअसेयेव या जोडीवर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारताचे हे सहावे सुवर्णपदक ठरले. या लढतीत पाकिस्तानचे खेळाडू बोपण्णा व शरण यांच्या बाजूने उभे होते.
बोपण्णाने 2010 मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक-कुरेशी याच्यासोबत अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. बोपण्णा आणि कुरेशी या जोडीला 'Peace Express' म्हणून संबोधले जाते. त्यात आशियाई स्पर्धेतील पाकिस्तानी खेळाडूंनी दाखवलेल्या पुढाकाराचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.