एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस :  जाईल्स सिमॉनला जेतेपद, केवीन अँडरसनला केले पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:38 AM2018-01-07T03:38:14+5:302018-01-07T03:38:19+5:30

फ्रान्सच्या जाईल्स सिमॉनने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अ‍ॅँडरसनचे एकेरीत आव्हान मोडीत काढत सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. शुक्रवारी उपांत्य फेरीत सिमॉनने अग्रमानांकित सिलीचला पराभवाचा धक्का दिला होता.

ATP Maharashtra Open Tennis: Giles defeats Simon to win title, Kevin Anderson | एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस :  जाईल्स सिमॉनला जेतेपद, केवीन अँडरसनला केले पराभूत

एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस :  जाईल्स सिमॉनला जेतेपद, केवीन अँडरसनला केले पराभूत

Next

पुणे : फ्रान्सच्या जाईल्स सिमॉनने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अ‍ॅँडरसनचे एकेरीत आव्हान मोडीत काढत सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. शुक्रवारी उपांत्य फेरीत सिमॉनने अग्रमानांकित सिलीचला पराभवाचा धक्का दिला होता.
महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत कोणतेही मानांकन नसलेल्या सिमॉनने जागतिक क्रमवारीत १२४ व्या क्रमांकावर असलेल्या आणि २०१७ मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या अ‍ॅँडरसनला ७-६ (४), ६-२ गुणांनी नमविले. सिमॉनने या स्पर्धेत माजी विजेता रॉबर्टा अगुतलासुद्धा घरचा रस्ता दाखविला आहे.
२९ वर्षीय सिमॉनने पहिल्या सेटमध्ये अधिक भक्कम सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. ७ व्या गेममध्ये सिमॉनने जोरदार खेळ करत केविन अँडरसनची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर १०गेममध्ये पुनरागमन करत अँडरसनने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली. त्यामुळे सामन्यात ५-५ अशी बरोबरी निर्माण झाली. अखेर दोन्ही खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये सिमॉन याने नेटजवळून आक्रमक खेळ करत हा सेट ७-६ (७-४) जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
पहिल्या सेटप्रमाणेच दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस सुरुवातीला राखल्या. सामन्यात ३-२ अशी स्थिती असताना सिमॉनने सहाव्या गेममध्ये अँडरसनची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. सिमॉन याने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला व विजेतेपदावर आपले नाव कोरले.
दुहेरीमध्ये नेदरलॅँडच्या रॉबिन हास व मात्वे मिडलकूप जोडीने पिएर हर्बर्ट व जाईल्स सिमॉन या जोडीचा ७-६, ७-६ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संयोजन समिती अध्यक्ष प्रवीणसिंग परदेशी, बनमाळी आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संयोजन समितीचे सचिव प्रवीण दराडे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पीसीएमसीचे कमिशनर श्रवण हर्डीकर, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर उपस्थित होते.

हे दोन्ही खेळाडू प्रथमच भारतात होत असलेल्या या एटीपी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. याआधी केविन याने २००८ मध्ये नोव्हाक जोकोविचचा पराभव करून एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धेतील विजेत्या जाईल्स सिमॉन याला यूएस ८९४३५ डॉलर व २५० एटीपी गुण, तर उपविजेत्या केविन अँडरसन यूएस ४७१०५ डॉलर व १५० एटीपी गुण देण्यात आले.

Web Title: ATP Maharashtra Open Tennis: Giles defeats Simon to win title, Kevin Anderson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.