इंडियन वेल्स (अमेरिका) : रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस दिग्गजांनी आपापल्या सामन्यांत अपेक्षित विजय मिळवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह उपांत्य फेरीत हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता वाढली आहे.जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या नदालने पुन्हा एकदा एकतर्फी झालेल्या लढतीत बाजी मारताना सर्बियाच्या फिलिप क्रेजिनोविच याचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या नदालने एक तास ५६ मिनिटांमध्ये फिलिपचे आव्हान संपुष्टात आणले.दुसरीकडे, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आपला दर्जेदार खेळ सादर करताना ब्रिटनच्या कायले एडमंड याचा अवघ्या ६४ मिनिटांमध्ये ६-१, ६-४ असा फडशा पाडला. फेडररच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे एडमंडचा काहीच निभाव लागला नाही. पुढील फेरीत फेडरर २२ वर्षीय हबर्ट हुर्कास्जविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)नदालने २००७, २००८ आणि २०१३ साली या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पुढील फेरीत नदाल जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्यारशियाच्या करेन खाचानोवविरुद्ध खेळेल.
एटीपी टेनिस: फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:43 AM