मेलबोर्न : सेरेना विलियम्सने युक्रेनच्या दयाना यास्त्रेमस्काचा पराभव करीत शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केले तर पुरुष विभागात अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचने पहिला सेट गमाविल्यानंतर विजय नोंदवला. त्यासाठी त्याने सदोष फ्लड लाईटला दोष दिला.मारग्रेट कोर्टच्या एकेरीतील विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्यास प्रयत्नशील असलेल्या सेरेना जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानावर असलेल्या यास्त्रेमस्काचा ६-२, ६-१ ने पराभव केला. सेरेनाला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हालेपने सेरेनाची थोरली बहीण व्हीनस विलियम्सचा ६-२, ६-३ ने पराभव केला.दोन वर्षांपूर्वी प्रेग्नंट असतानाही येथे कारकिर्दीतील २३ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला येथे १६ वे मानांकन देण्यात आले आहे, पण ती जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. सेरेनाने १९९९ मध्ये कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते त्यावेळी तिची प्रतिस्पर्धी सास्त्रेमस्काचा जन्मही झाला नव्हता.पुरुष एकेरीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार जोकोविचने कॅनडाच्या डेनिस शापोवालोवचा ६-३, ६-४, ४-६, ६-० ने पराभव केला, पण दरम्यान त्याला एक सेटही गमवावा लागला. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी सातवे विजेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेला जोकोविच तिसºया सेटमध्ये ३-० ने आघाडीवर होता. कोर्टवर उन्ह असताना रॉड लेव्हर परिसरात फ्लड लाईटही सुरू झाले. त्यामुळे जोकोविचची एकग्रता भंग झाली आणि त्याने पुढील सातपैकी सहा गेम्स गमावले. त्याने फ्रेंचचे पंच डेमियन डुमुसोईस यांना फ्लड का सुरू करण्यात आले, अशी विचारणाही केली.दरम्यान, महिला एकेरीत यूएस ओपन चॅम्पियन जपानची खेळाडू नाओमी ओसाका व सहावे मानांकन प्राप्ता इलिना स्वितलोना यांना निर्णायक सेटपर्यंत घाम गाळावा लागला. महिला विभागात चौथे मानांकन प्राप्त ओसाकाने तायवानची अनुभवी खेळाडू सीह सू वेईचा ७-५, ४-६, ६-१ ने पराभव करीत अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केले. तिला पुढच्या फेरीत लाटवियाच्या एनस्तेसिया सेवास्तोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तिने चीनच्या वांग क्वियांगचा ६-३, ६-३ ने पराभव केला.स्वितलोनाला खांदा दुखापतीवर वारंवार उपचार करावे लागले. चीनच्या झांग शुहाईविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर स्वितलोनाने पुनरागमन करीत ४-६, ६-४, ७-५ ने सरशी साधली. १७ वे मानांकन प्राप्त अमेरिकेची मेडिसन किज व १८ वे मानांकन प्राप्त स्पेनची गर्वाइन मुगुरुजा आगेकूच करण्यात यशस्वी ठरल्या. किजने बेल्जियमच्या १२ व्या मानांकित एलिस मार्टन्सचा ६-३, ६-२ ने तर मुगुरुजाने स्वित्झलंडच्या टिमिया बासिनस्कीचा ७-६(७/५), ६-२ ने पराभव केला.जपानच्या केई निशिकोरीने पुरुष एकेरीत अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केले. आठव्या मानांकित निशिकोरीने पोर्तुगालच्या जोओ सोऊसाचा ७-६(८/६), ६-१, ६-२ ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू मिलोस राओनिचने फ्रान्सच्या पियरे 'ूज हरबर्टचा ६-४, ६-४, ७-६(८/६) पराभव करीत चौथी फेरी गाठली. पुढच्या फेरीत त्याची गाठ चौथ्या मानांकित अलेक्सांद्र जेवरेवसोबत पडणार आहे. जेवरेवने आॅस्ट्रेलियाच्या एलेक्स बोल्टचा ६-३, ६-३, ६-२ ने पराभव केला. क्रोएशियाच्या ११ व्या मानांकित बोर्ना कोरिचने सब्रियाच्या फिलिप क्राजिनोविचचा २-६, ६-३, ६-४, ६-३ ने पराभव केला.१५ व्या मानांकित रशियाच्या दानिल मेदवेदेवने बेल्जियमच्या २१ व्या मानांकित डेव्हिड गोफिनचा ६-२, ७-६(७/३), ६-३ ने आणि स्पेनच्या २३ व्या मानांकित पाब्लो कारेनो बस्ता याने इटलीच्या १२ व्या मानांकित फॅबियो फोगनिनीचा ६-२, ६-४, २-६, ६-४ ने पराभव करीत पुढची फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना उपउपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 3:50 AM