कॅरोलिन वोज्नियाकी पहिल्याच फेरीत बाद, नदाल, जोकोविच यांची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:02 AM2019-05-28T04:02:59+5:302019-05-28T04:03:08+5:30
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला अनपेक्षित पराभवासह पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.
पॅरीस : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला अनपेक्षित पराभवासह पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. पुरुष गटात राफेल नदाल व नोव्हाक जोकोविच यांनी अपेक्षित विजयी सलामी दिली.
जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू वोज्नियाकीला जागतिक क्रमवारीत ६८व्या स्थानावरील रशियाच्या वेरोनिका कुदेरमेतोवाकडून ६-०, ३-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखलेल्या वोज्नियाकीने सलग सहा गेम जिंकत दिमाखात सुरुवात केली. मात्र यानंतर वेरोनिकाने सलग दोन सेट एकतर्फी जिंकताना धक्कादायक विजयाची नोंद केली. अन्य सामन्यात चौथ्या मानांकीत नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने फ्रान्सच्या पाउलिन पारमेंटियरचा ६-३, ६-४ असा पराभव करुन विजयी सुरुवात केली.
दुसरीकडे, दिग्गज राफेल नदालने दिमाखात विजयी सलामी दिली. ‘क्ले कोर्टचा बादशहा’ अशी ओळख असलेल्या नदालने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या याननिक हान्फमनचा एक तास ५७ मिनिटांमध्ये ६-२, ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. नदालच्या ताकदवान खेळापुढे याननिकचा काहीच निभाव लागला नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा एकाच मोसमात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या निर्धाराने खेळणाºया जोकोविचने शानदार विजयी सलामी देताना पोलंडच्या हुबर्ट हरकाज याचा ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.
रशियाच्या दानिल मेदवेदेवला पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही फ्रान्सच्या पियरे ह्यूज हरबर्टविरुद्ध ६-४, ६-४, ३-६, २-६, ५-७ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)
>दुखापतीमुळे क्विटोव्हाची माघार
डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर पेट्रा क्विटोव्हाने सोमवारी विम्बल्डन स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त राहील, अशी आशा व्यक्त केली.
सहावे मानांकनप्राप्त व दोन वेळेसची विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाने दोन ते तीन आठवडे कोर्टपासून दूर राहणार असल्याचे सांगितले. तिने म्हटले की, ‘माझ्या हाताच्या पुढील भागाला दुखापत झाली असल्याने मला खेळण्यास त्रास होत आहे.’
‘मी तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन खेळण्यास सुरू करेन. यामुळे मला ग्रासकोर्टवर पुनरागमन करण्यास मदत मिळेल. फ्रेंच ओपनमधून माघार घेणे निराशाजनक आहे,’ असेही क्विटोव्हाने यावेळी म्हटले.