डेव्हिस चषक टेनिस; लिएंडर पेसचे पाकविरुद्ध पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:22 AM2019-11-15T04:22:23+5:302019-11-15T04:22:32+5:30
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी गुरुवारी अनुभवी दिग्गज लिएंडर पेस याचे वर्षभराहून अधिक काळानंतर पुनरागमन झाले.
नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी गुरुवारी अनुभवी दिग्गज लिएंडर पेस याचे वर्षभराहून अधिक काळानंतर पुनरागमन झाले. याशिवाय पाकविरुद्ध खेळण्यास आधी नकार देत व नंतर इस्लामाबादला जाण्यास तयार झालेले सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशिकुमार मुकुंद आणि रोहण बोपन्ना यांना देखील संघात स्थान देण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता.
अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) जाहीर केलेल्या संघात जीवन नेदुनचेझियन, साकेत मायनेनी, व सिद्धार्थ रावत यांना स्थान मिळाले. एआयटीए लढतीसाठी ५ खेळाडूंचा संघ जाहीर करून संघात २ राखीव खेळाडू ठेवले जातात. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे आयोजित ही लढत तटस्थस्थळी खेळविण्याच्या विचारात असलेला आंतरराष्टÑीय महासंघ अद्याप पाकने दाखल केलेल्या अपीलावर गंभीर विचार करीत असला, तरी एआयटीएने संघ जाहीर केला.
अव्वल खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनच्या अनुपस्थितीत एकेरीत भारताची मदार सुमित नागल (१२७ वी रँक) व रामकुमार(१२६) यांच्यावर असेल. मुकुंद (२५०) तसेच मायनेनी (२६७) हेही बॅकअप खेळाडू असतील. संघात प्रथमच बोपन्ना, पेस व नेदुनचेझियन यांच्या रुपात दुहेरीचे तीन तज्ज्ञ खेळाडू आहेत. (वृत्तसंस्था)
>पाकविरुद्ध लढत १४ आणि १५ सप्टेंबर रोजी होणार होती. त्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या संघात नागलचा समावेश नव्हता. जखमी असल्याने त्याने माघार घेतली होती. दिविज शरण आणि प्रजनेश यांना संघात स्थान देण्यात आले होते. तथापि इस्लामाबादमधील सुरक्षेच्या चिंतेमुळे सामन्याला उशीर झाल्याने आता दोघेही खासगी कारणास्तव उत्सुक नाहीत. शरण २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होत असून पुढील दोन आठवडे तो विदेशात असेल. प्रजनेश देखील २८ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होत आहे.
>पाकिस्तानात खेळण्यास उत्सुक असलेल्या पेसने एप्रिल २०१८ मध्ये चीनविरुद्ध ऐतिहासिक दुहेरी विजयाची नोंद केली होती. त्यानंतर मात्र एआयटीएने निवडीसाठी त्याच्या नावाचा विचारच केला नव्हता. बोपन्नाच्या सोबतीने डी झेंग- माओ गोंग या चीनच्या जोडीवर मात करीत पेस डेव्हिस चषकाच्या इतिहासात दुहेरीत सर्वात यशस्वी खेळाडू बनला होता. त्याचा हा ४३ वा विजय होता.
पेसने इटलीचा निकोला पिएत्रेंगेली (४२ विजय) याला मागे टाकले होते. निवड समितीच्या बैठकीला बिगर खेळाडू कर्णधार रोहित राजपाल, बलरामसिंग, झिशान अली आणि अंकिता भांबरी यांनी हजेरी लावली तर नंदनबाळ हे व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे जुळले होते.
.भारतीय
टेनिस संघ :
सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशीकुमार मुकुंद, साकेत मायनेनी, रोहण बोपन्ना, लियांडर पेस, जीवन नेदुनचेझियान आणि सिद्धार्थ रावत.
बिगर खेळाडू कर्णधार :
रोहित राजपाल.
प्रशिक्षक : झिशान अली.
फिजियो : आनंद कुमार.
संघ व्यवस्थापक :
सुंदर अय्यर.