पॅरिस : एखादा सामना जिंकला की खेळाडू आनंद साजरा करतात. पण सामना जिंकल्यावर मात्र नोव्हाक जोकोव्हिचला काय राग आला कुणास ठाऊक, त्याने विजयानंतर मैदानामध्ये आपले रॅकेट आपटून तोडून टाकले.
फ्रेंच खुल्या स्पर्धेत सर्बियाच्या जोकोव्हिचचा सामना स्पेनच्या रोबर्टो बतिस्ता अगुटबरोबर सुरु होता. या सामन्यात अगुटने जोकोव्हिचला चांगलेच झुंजवले. जोकोव्हिचला वाटले होते की, हा सामना सहज जिंकून आपण अंतिम 16 खेळाडूंमध्ये सहज प्रवेश करू, पण तसे घडले मात्र नाही.
जोकोव्हिचने अगुटबरोबरच्या सामन्यात पहिले दोन सेट जिंकले होते. पण तिसऱ्या सेटमध्ये त्याला 6-7 असा पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर चौथा सेट जिंकत जोकोव्हिचने अगुटवर 6-4, 6-7, 7-6, 6-2 असा विजय मिळवला. पण आपल्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे जोकोव्हिचने आपला राग रॅकेटवर काढला. त्याने मैदानातच रॅकेट आपटत ती मोडून टाकली.