जोकोविच-नदाल अंतिम सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:17 AM2019-01-26T04:17:58+5:302019-01-26T04:18:10+5:30
नोवाक जोकोविच याने शुक्रवारी आपल्या विक्रमी सातव्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकले.
मेलबर्न : नोवाक जोकोविच याने शुक्रवारी आपल्या विक्रमी सातव्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकले. त्याने फ्रान्सच्या २८व्या मानांकित लुका पुई याला ६-०, ६-२, ६-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जोकोविचचा सामना नदालसोबत होईल.
जगातील नंबर वन खेळाडूने शानदार खेळ करत २०१६ नंतर मेलबर्नमध्ये पहिल्या अंतिम फेरीत जागा मिळवली. जोकोविच याने २४ विनर लगावले आणि फक्त पाच अनफोर्स्ड चुका केल्या. तो म्हणाला की, ‘मी निश्चितपणे या कोर्टवर जेवढे सामने खेळले आहेत. त्यातील हा सर्वांत चांगला सामना होता.’
जोकोविच गेल्या वर्षी चौथ्या फेरीत पराभूत झाला होता. आता त्याचा सामना दुसऱ्या मानांकित नदालसोबत होणार आहे. या दोघांमध्ये कारकिर्दीतील हा ५३वा सामना असेल आणि ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीतील आठवा सामना आहे.
या दोघांमध्ये २०१२ आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम सामना झाला होता. त्यात जोकोविच याने पाच तास ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये ७-५ असा विजय मिळवला. जोकोविच याला लुका पुई याला पराभूत करण्यासाठी फक्त ८३ मिनिटे लागली. १४ वेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या जोकोविच याने उपांत्य पूर्व फेरीत केई निशीकोरीला पराभूत केले होते. जोकोविचने पहिला सेट फक्त २१ मिनिटातच ६-० असा जिंकला होता. दुसºया सेटमध्ये पुई याने पहिली सर्व्हिस वाचवली. मात्र जोकोविच याने लगेचच आपल्या नावे केली.
>स्टोसुर- झांग यांना दुहेरीचे जेतेपद
आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर व चीनच्या झांग शुआइ या जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. स्टोसूर- झांग या जोडीने बिगर मानांकित हंगेरीची टिमिया बाबोस व फ्रान्सची ख्रिस्तिना म्लादेनोविच या गतविजेत्या जोडीला पराभूत करत आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे जेतेपद आपल्या नावे केले.
स्टोसूर-झांग जोडीने बाबोस-म्लादेनोविच या जोडीचा ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रथमच ग्रॅँडस्लॅममधील दुहेरीचे जेतेपद मिळवलेली शुआई म्हणाली, ‘ हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.’ स्टोसूरने यापूर्वी लिसा रेमंडच्या साथीने २००५ मध्ये अमेरिकन ओपन व २००६ मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले होते
>या मैदानावर मी खेळलेल्या सामन्यापैकी हा सर्वोत्तम सामना होता. मी जसे ठरवले होते तसेच घडल्यामुळे मी आनंदी आहे.
- जोकोविच