शिकागो - युवा अलेक्झांडर झ्वेरेव याने केव्हिन अँडरसन याच्यावर मात केली आणि या शानदार विजयासह टीम युरोपने लावेर चषक टेनिस स्पर्धेत पुन्हा विजेतेपद पटकावले. यासह टीम युरोपला आपले जेतेपद कायम राखण्यात यश आले. टीम युरोपने शानदार खेळ करताना विश्व संघाचा १३-८ असा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.जर्मनीच्या झ्वेरेवने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर विश्व संघाकडून खेळणाऱ्या अँडरसनला ६-७ (३-७), ७-५, १०-७ असे पराभूत केले. या कामगिरीने युरोपने आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर अँडरसन बाजी मारणार असे दिसत होते. मात्र, झ्वेरेवने झुंजार खेळ करताना अँडरसनचे कडवे आव्हान यशस्वीपणे परतावून लावले.तत्पूर्वी, विश्व संघाने जबरदस्त मुसंडी मारताना विजेतेपदाच्या आशा उंचावल्या होत्या. अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि जॅक सॉक यांनी दुहेरीत झ्वेरेव आणि जागतिक क्रमवारीतील एकेरीचा दुसºया क्रमांकावरील खेळाडू रॉजर फेडरर याचा ४-६, ७-६ (७-२), ११-९ असा पराभव केला. त्यामुळे विश्व संघाने ८-७ अशी आघाडी मिळवली. मात्र, यानंतर फेडररने एकेरीत इस्नरला ६-७ (५-७), ७-६ (८-६), १०-७ असे नमवून युरोपियन संघाला तीन महत्त्वपूर्ण गुण मिळवून दिले. (वृत्तसंस्था)
लावेर टेनिस चषकावर टीम युरोपचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 4:29 AM