इंडियन वेल्स (यूएस) : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने यंदाच्या मोसमातील आपली विजयी घोडदौड कायम राखताना इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जेतेपदासाठी त्याची लढत अर्जेंटिनाचा जागतिक क्रमवारीतील आठवा खेळाडू जुआन मार्टिन डेल पोत्रो याच्याविरुद्ध होईल.तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात फेडररला विजयासाठी क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचविरुद्ध घाम गाळावा लागला. अप्रतिम तंदुरुस्ती आणि प्रदीर्घ अनुभव या जोरावर फेडररने पहिला सेट गमावल्यानंतरही शानदार पुनरागमन करताना सलग दोन सेटमध्ये बाजी मारत कोरिचचे आव्हान ५-७, ६-४, ६-४ असे परतावले. पहिला सेट जिंकून कोरिचने अनपेक्षित सुरुवात करत फेडररला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवी फेडररने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोरिचची झुंज अपयशी ठरवली.आता या स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपद उंचावण्यासाठी फेडररपुढे जुआन मार्टिन डेल पोत्रो याचे कडवे आव्हान असेल. डेल पोत्रो याने सहजपणे अंतिम फेरी गाठताना कॅनडाच्या मिलोस राओनिच याचे आव्हान केवळ ६५ मिनिटांमध्ये ६-२, ६-३ असे परतावले. (वृत्तसंस्था)>विजयी घोडदौड...यंदाच्या मोसमात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने सलग १७वा सामना जिंकला आहे. याआधी २००६ साली फेडररने एखाद्या मोसमाची सर्वोत्तम सुरुवात केली होती. त्यावेळी फेडररने सलग १६ विजय नोंदवले होते.
फेडररची अंतिम फेरीत धडक, जेतेपदासाठी डेल पोत्रोचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:30 AM