कारकिर्दीतील शंभरावे एटीपी जेतेपद पटकाविण्याची फेडररला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:53 AM2019-01-14T06:53:47+5:302019-01-14T06:53:58+5:30
आॅस्ट्रेलियन ओपनचा थरार : मरेची मेलबर्नमधील अखेरची स्पर्धा
मेलबर्न : रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच हे दोन्ही दिग्गज सोमवारपासून सुरूहोणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सातवे विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील, तर अँडी मरे मेलबर्न पार्कवर अखेरच्या वेळेस खेळाडूंना आव्हान देताना दिसेल.
त्याचवेळी दिग्गज फेडरर या स्पर्धेत हॅटट्रिकच्या निर्धाराने खेळणार असून त्याला कारकिर्दीतील शंभरावे एटीपी जेतेपद पटकावण्याची संधी आहे. यामध्ये तो यशस्वी ठरला, तर शंभर एटीपी जेतेपद पटकावणारा फेडरर विश्वातील केवळ दुसरा टेनिसपटू ठरेल. याआधी अमेरिकेचा महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यानेच शंभर एटीपी जेतेपद पटकावले असून त्याच्या नावावर १०९ जेतेपदांची नोंद आहे.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू जोकोविच आणि तृतीय मानांकित फेडररला चौथ्या मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव्हसारख्या युवा खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळेल, तर झ्वेरेव्ह पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळेल.
मरेने हिप सर्जरीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे यावर्षी निवृत्ती पत्करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विम्बल्डन खेळून कारकीर्दीला पूर्णविराम देण्याची त्याची इच्छा होती; परंतु कदाचित आॅस्ट्रेलियन ओपन त्याची अखेरची स्पर्धा ठरू शकते. जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू राफेल नदालच्या तंदुरुस्तीवरदेखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्याने ब्रिस्बेन स्पर्धेतून माघार घेतली होती; परंतु आता पूर्णपणे तंदुरुस्त असून, नवीन प्रकारच्या सर्व्हिससह स्पर्धेत खेळणार असल्याचा दावा त्याने केला आहे.
फेडरर त्याचा सलामीचा सामना डेनिस इस्तोमिनविरुद्ध खेळेल. याच कोर्टवर फेडररने गतवर्षी त्याचे २0 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी त्याने सहा वेळेसचा चॅम्पियन जोकोविच आणि राय इमर्सन यांची बरोबरी केली होती.
जोकोविचचे २०१८ मध्ये सुरुवातीलाच आव्हान संपुष्टात आले होते व त्याला हाताच्या कोपºयावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. त्यानंतर खराब कामगिरीमुळे तो अव्वल २० च्या बाहेर फेकला गेला होता.
जोकोविच जुलैमध्ये विम्बल्डन विजेतेपदासह पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आणि त्यानंतर पूर्ण वर्षात त्याने फक्त तीन सामने गमावून पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केला. तो एटीपी फायनल्समध्ये विजेतेपदाच्या लढतीत झ्वेरेव्हकडून पराभूत झाला होता. जोकोविचला आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिल्या फेरीत मंगळवारी अमेरिकेच्या मिशेल क्रूगर याच्याविरुद्ध दोन हात करावे लागेल.