इंडियाना वेल्स : रॉजर फेडरर. क्रीडा विश्वाला सुपरिचीत असेच. आतापर्यंत बरीच यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. पण या जगातील धनवान टेनिसपटूची मुलं पॉकेटमनीसाठी काम करत आहेत, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण खरंच इंडियाना वेल्स येथे राहत असताना फेडररची चार मुलं पॉकेटमनीसाठी हा ' उद्योग ' करत असल्याचे साऱ्यांसमोर आले आहे.
फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत. सध्या फेडरर हा इंडियाना वेल्स मास्टर्स ही टेनिस स्पर्धा खेळत आहे. आतापर्यंत कोट्यावधी कमावणारा फेडरर हा सध्या इंडियाना वेल्स येथे भाडेतत्वावर राहत आहे. गेली बरेच वर्षे फेडरर येथे भाड्याच्या घरात राहतो आणि त्यालाही अशापद्धतीने राहणे आवडते.
फेडरर जर कोट्यावधी कमावतो, तर त्याच्या मुलांना पॉकेटमनीसाठी ' उद्योग ' का करावा लागतो? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. ते नेमके कोणता उद्योग करतात, याची उत्सुकतादेखील बऱ्याच जणांना असेल. फेडररला मायला आणि शार्लिन या दोन जुळ्या मुली आहेत, तर लिओ व लेनी हे दोन जुळे मुलगे आहेत. या चार जणांनी मिळून आपल्याला काही पैसे कमावण्यासाठी लिंबू पाणी विकण्याचा उद्योग सुरु केला, असे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. दस्तुरखुद्द फेडररनेही या गोष्टीचा खुलासा केला आहे.
आपल्या मुलांच्या ' उद्योग 'बद्दल फेडरर म्हणाला की, " माझी चारही मुलं पॉकेटमनी मिळवण्यासाठी लिंबूपाणी विकण्याचे काम करत आहेत. लिंबूपाणी विकून त्यांनी एका दिवसात 70 डॉलर एवढी कमाईही केली आहे. मी स्पर्धेत व्यस्त आहे, नाहीतर मीदेखील त्यांना मदत केली असती. "