पर्थ- क्रिकेटमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांचे जसे दररोज नवनवीन विजयांशी सख्य आहे तसेच टेनिसमध्येरॉजर फेडररचे आहे. अजून २०१९ चा पहिला आठवडा संपला नाही पण एवढ्यात त्याने यंदाचा पहिला विक्रम आपल्या नावावर लावला आहे.
मिश्र टेनिसच्या हॉपमन कप या सांघिक स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी खेळाडू ठरलाय. स्वित्झर्लंडच्या संघाने चौथ्यांदा जिंकलेल्या हॉपमन कपच्या विजेतेपदादरम्यान त्याने हा विक्रम केलाय. या चारपैकी तीन विजयांचा फेडरर भागीदार आहे आणि इतर कोणत्याही खेळाडूने एवढ्या वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही.
पर्थ येथे शनिवारी फेडरर व बेलिंडा बेंकिचच्या स्वीस संघाने अंतिम सामन्यात जर्मनीवर २-१ असा विजय मिळवला. या संमिश्र सांघिक स्पर्धेचे कदाचित हे शेवटचे वर्ष असण्याची शक्यता आहे कारण पुढील वर्षापासून २४ संघांची एटीपी वर्ल्ड टीम कप स्पर्धा होणार आहे आणि ही स्पर्धा हॉपमन कप स्पर्धेची जागा घेण्याची दाट शक्यता आहे.
फेडरर व बेंकिच जोडीचे हे सलग दुसरे हॉपमन कप अजिंक्यपद आहे. योगायोगाने त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव आणि अँजेलिक कर्बर जोडीला मात दिली. दोन्ही वर्षी फेडररने आपला एकेरीचा व दुहेरीचा सामना जिंकला तर बेंकिच ही दोन्ही वेळा एकेरीचा सामना गमावल्यावर दुहेरीतील विजयात फेडररची साथीदार होती.
फेडररने २००१ मध्ये मार्टिना हिंगिसच्या जोडीने पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकल्यावर आता २०१८ व २०१९ मध्ये बेलिंडा बेंकिचसोबत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीच्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात फेडररने झ्वेरेवला ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात दिली मात्र, जर्मनीच्या कर्बरने बेलिंडाला ६-४, ७-६ (८-६) असे नमवत लढत १-१ बरोबरीवर आणली होती. त्यानंतर निर्णायक दुहेरीच्या सामन्यात स्वीस जोडीने ४-०, १-४, ४-३ (५-४) असा विजय मिळवला.
दुहेरीचा सामना फर्स्ट टू फोर या नव्या नियमानुसार खेळला गेला. त्यात जो संघ प्रथम चार गेम (दोनच्या फरकाने) जिंकेल तो सरस आणि ३-३ बरोबरी झाल्यास टायब्रेकर या पध्दतीने हा सामना खेळला गेला.
या स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्या वर्षी फेडरर एकेरीच्या सामन्यांमध्ये अपराजित राहिला. यंदा त्याने अमेरिकेचा फ्रान्सेस टिफो, ग्रीसचा त्सीत्सीपास, ब्रिटनचा अॅमेरॉन नॉरी आणि जर्मनीचा अॅलेक्झांडर झ्वेरेव यांच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासह पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी त्याने परफेक्ट तयारी केली आहे.
हॉपमन कपमधील सर्वात यशस्वी खेळाडू ठरल्याबद्दल फेडरर म्हणाला की, या विक्रमाने मी अतिशय आनंदीत आहे पण मी येथे विक्रमांसाठी आलेला नव्हतो.