अंतराळात खेळला जाणार पहिला टेनिस सामना! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:45 AM2018-08-21T11:45:34+5:302018-08-21T11:45:57+5:30

अंतराळवीर अँड्य्रू फेस्टेल यांचा प्रयोग; टेनिसपटू डेल पोत्रो करणार मार्गदर्शन.

First tennis match to be played in space! | अंतराळात खेळला जाणार पहिला टेनिस सामना! 

अंतराळात खेळला जाणार पहिला टेनिस सामना! 

googlenewsNext

- ललित झांबरे
टेनिसच्या इतिहासात लवकरच नवा अध्याय लिहिला जाणार आहे. अमेरिकन वेळेनुसार मंगळवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता (भारतीय वेळेनुसार बुधवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा.) अंतराळात पहिल्यांदाच टेनिस खेळले जाणार आहे आणि याचे यु.एस.ओपनच्या फेसबूक पेजवर, यू ट्युबवर आणि ट्विटर हँडलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याशिवाय युएस टेनिस असोसिएशन (युएसटीए) च्या बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या परिसरातील 120 फुटी व्यासाचा स्टील ग्लोब 'युनीस्फीअर' वरही अंतराळातील हा पहिला टेनिस सामना थ्री डी मध्ये दाखविण्यात येणार आहे.  हा प्रयोग म्हणजे केवळ टेनिसच नाही तर समस्त क्रीडाजगतासाठी नवा इतिहास राहणार आहे. 

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) हा ऐतिहासिक प्रयोग होणार आहे आणि त्यात नासाच्या अंतराळ मोहिम 56 चे कमांडर फेस्टेल हे आपल्या सहकाऱ्यांसोबत दुहेरीचा एक गेम खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये रिकी अर्नाल्ड (नासा), अॅलेक्झांडर जर्स्ट (युरोपियन स्पेस एजन्सी) आणि सेरेना ऑनन-चॅन्सेलर (नासा) या तीन फ्लाईट इंजिनिअर्सचा समावेश आहे.ही चार मंडळी अंतराळात टेनिस खेळणारे पहिले टेनिसपटू बनण्याचा इतिहास घडविणार आहेत आणि त्यासाठी त्यांना भूतलावरुन युआन मार्टिन डेल पोट्रो हा आघाडीचा टेनिसपटू मार्गदर्शन करणार आहे.

डेल पोत्रो हा सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून 2009 चा यू. एस. ओपन विजेता आहे. टेनिसची आवड असणारे नव्हे, अक्षरशः टेनिसवेडे असलेले कमांडर फेस्टेल हे त्याच्याशी अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी दुपारी 12.35 वा.(भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 10 वा.)   व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 20 मिनिटे संवाद साधणार आहेत. त्यातून अंतराळात टेनिस कसे खेळता येईल याचा सल्ला ते डेल पोट्रोकडून घेणार आहे. आपल्याला अशी काही अफलातून संधी मिळेल याची आपण कधी कल्पनासुध्दा केलेली नव्हती, असे डेल पोत्रोने या ऐतिहासिक संधीबद्दल म्हटले आहे. 


जियोफिझिक्समध्ये डॉक्टरेट केलेले कमांडर फेस्टेल म्हणतात की, अंतराळात गुरूत्वाकर्षण नसल्याने चेंडू उसळणारच नाही. तसा गुरुत्वाचाही परिणाम असणार नाही. त्यामुळे टेनिस नेमके कसे खेळायचे हे मोठेच आव्हान असेल. पण आम्ही त्यासाठी तयार आहोत. कदाचित आम्हाला काही वेगळे नियम ठरवावे लागतील. 

कमांडर फेस्टेल यांच्या या प्रयोगाबद्दल व्यावसायिक टेनिसपटूंमध्येही मोठी उत्सुकता आहे. म्हणून जॉन इस्नर, फ्रान्सेस टिफो, स्टिव्ह जॉन्सन, डोनाल्ड यंग आणि केव्हिन अँडरसन या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी त्यांना व्हिडिओ संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. ते कसे खेळतात हे बघून आपणही भविष्यात अंतराळात खेळायचा विचार करू, असे इस्नरने गमतीने म्हटले आहे. 

#TminusNetGeneraton या हॅशटॅगवरून या इतिहासाचे साक्षीदार होता येईल असे 'यूएसओपन' ने ट्विटरद्वारे कळविले आहे.

Web Title: First tennis match to be played in space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.