फ्रेंच ओपन : नदालचा संघर्षपूर्ण विजय, विक्रमी ८० व्या विजयाची नोंद; युकीचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:03 AM2018-05-30T05:03:50+5:302018-05-30T05:03:50+5:30

फ्रेंच ओपनचा बादशहा राफेल नदाल याला फ्रेंच ओपनमध्ये आपले ११ वे विजेतेपद कायम ठेवण्याच्या अभियानाच्या प

French Open: Nadal struggled to win, record record 80th win; Yuki's challenge ended | फ्रेंच ओपन : नदालचा संघर्षपूर्ण विजय, विक्रमी ८० व्या विजयाची नोंद; युकीचे आव्हान संपुष्टात

फ्रेंच ओपन : नदालचा संघर्षपूर्ण विजय, विक्रमी ८० व्या विजयाची नोंद; युकीचे आव्हान संपुष्टात

Next

पॅरिस : फ्रेंच ओपनचा बादशहा राफेल नदाल याला फ्रेंच ओपनमध्ये आपले ११ वे विजेतेपद कायम ठेवण्याच्या अभियानाच्या पहिल्या फेरीत खूप संघर्ष करावा लागला. अखेर तो इटलीच्या सायमन बोलेली याचे कडवे आव्हान पार करून येथे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत विक्रमी ८० वा विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन स्पेनचा खेळाडू नदालने दोन दिवस चाललेल्या या सामन्यात तिसऱ्या सेटमध्ये चार सेट पॉइंट वाचवताना ६-४, ६-३, ७-६ (११-९) असा विजय नोंदवला. हा सामना २ तास ५७ मिनिटे रंगला. हा सामना काल पूर्ण होऊ शकला नव्हता. तेव्हा नदालने पहिले दोन सेट जिंकले होते; परंतु तिसºया सेटमध्ये त्याने सुरुवातीलाच आपली सर्व्हिस गमावली होती. बोलेली याने आज मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. नदालने सुरुवातीला त्याची सर्व्हिस तोडली होती; परंतु जागतिक क्रमवारीत १२९ व्या क्रमांकावर असणाºया बोलेली याने त्याला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. हा सेट अखेर टायब्रेकरपर्यंत खेचला गेला त्यात नदालने चार सेट पॉइंट वाचवले.
अखेरीस बोलेली याचा फोरहॅण्ड नेटवर आदळल्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये दहा वेळेस चॅम्पियन राहिलेल्या नदालने तीन मॅच पॉइंटवर विजय नोंदवला. नदालची दुसºया फेरीत अर्जेंटिनाच्या गुइडो पेल्ला याच्याशी लढत होणार आहे. नदालचा आजचा हा फ्रेंच ओपनमधील ८० वा विजय आहे. एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये ८० किंवा त्यापेक्षा जास्त सामने जिंकणारा तो फक्त तिसराच खेळाडू आहे. जिमी कॉनर्सने यूएस ओपनमध्ये विक्रमी ९८ आणि विम्बल्डनमध्ये ८४ सामने जिंकले आहेत, तर रॉजर फेडररने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ९४, विम्बल्डनमध्ये ९१ आणि यूएस ओपनमध्ये ८२ विजय नोंदवले.
दरम्यान, माजी चॅम्पियन आणि तृतीय मानांकित गबाईन मुगुरुजाने पहिल्या फेरीत २००९ ची चॅम्पियन स्वेटलाना कुज्नेत्सोव्हा हिचा ७-६ (७-०), ६-२ असा पराभव केला. तिला आता फ्रान्सच्या वाईल्डकार्डने प्रवेश घेणाºया फियानो फेरो हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसुरनेदेखील बेल्जियमच्या यानिना विकमेयर हिच्यावर ६-२, ६-४ असा सहज विजय नोंदवला. अमेरिकेची बेथानी माटेक सँडस्देखील पुढील फेरीत पोहोचली आहे. तिने स्वीडनच्या योहाना लार्सनचा ६-४, ६-३ असा पराभव केला. पुरुष गटात क्रोएशियाच्या तृतीय मानांकित मारिन सिलीच आणि दक्षिण आफ्रिकेच्या सहाव्या मानांकित केविन अँडरसनने विजय मिळवत दुसºया फेरीत मजल मारली. सिलीचने आॅस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ६-३, ७-५, ७-६ (७-४) ने पराभव केला.

सेरेनाचे विजयासह पुनरागमन
अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यमसने महिलांच्या एकेरीतील आपल्या पहिल्या लढतीत झेक गणराज्याच्या क्रिस्टीना प्लिस्कोव्हाला ७-६, ६-४ गुणांनी पराभव करून विजयासह पुनरागमन केले. २०१७ आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यानंतर सेरेनाचा हा मोठ्या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. विजयानंतर सेरेना म्हणाली, गतवर्षी मी या स्पर्धेत खेळू शकले नाही, कारण मी आई होणार होते. या विजयाने मी आनंदी आहे.

भारताचा युकी भांबरी पहिल्याच फेरीत पराभूत
भारताचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांबरी याला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. बेल्जिअमच्या रुबेन बेमेलमान्स याने युकीवर ६-४,६-४,६-१ असा विजय मिळवला. जागतिक रँकिंगमध्ये ९३ वे स्थान असलेल्या युकी भांबरी याने पहिल्या दोन्ही सेटमध्ये संघर्ष केला. मात्र ११० वे रँकिंग असलेल्या रुबेन बेमेलमान्स याने आपल्या अनुभवाचा फायदा घेत युकीला चुका करण्यास भाग पाडले.त्याच्या वेगवान सर्व्हिसपुढे युकीला फार काही करता आले नाही. त्याने तिसºया सेटमध्ये तर युकीवर ६-१ असा विजय मिळवला. आणि सामना सहज खिशात झाला.

पुरूष दुहेरीत रोहन बोपन्ना विजयी
भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला आहे. बोपन्ना याने त्यांचा फ्रान्सचा साथीदार ईडवर्ड रॉजर वॅसेलीन याच्या साथीने अमेरिकन जोडी फ्रान्सेस टियाफोयु आणि टेलर फ्रिट्झ यांच्यावर सरळ सेटमध्ये ६-३,६-१ गुणांनी विजय मिळवला. बोपन्ना याने गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.

Web Title: French Open: Nadal struggled to win, record record 80th win; Yuki's challenge ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.