पॅरिस : अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळणार नाही.
सेरेनाने फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुनरागमन केले होते. कारण आई झाल्यानंतर सेरेना थेट या स्पर्धेतच खेळायला उतरली होती. त्यामुळे सेरेना पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता चाहत्यांना होती. सेरेनाने या स्पर्धेतील तीन सामने जिंकले होते. त्यानंतर चौथ्या सामन्यात सेरेनाचा सामना मारिया शारापोव्हाबरोबर होणार आहे. दोन मातब्बर खेळाडू एकमोकांसमोर येणार, हे समजल्यावर चाहते हा सामना पाहण्यासाठी आसुलले होते.
चौथ्या सामन्यापूर्वीच आपण जायबंदी असल्याचे जाहीर केले. सेरेनाच्या छातीतील स्नायू दुखावले गेले असून तिला सर्व्हिस करताना त्रास जाणवत होता. त्यामुळे सेरेनाने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता सेरेना पॅरिसमध्ये असून येथेच ती वैद्यकीय चाचणी करणार आहे.