मुंबई - टेनिसप्रेमींसाठी आनंदाची बातमी शुक्रवारी येऊन धडकली... स्पर्धा युगात टिकून राहाण्याच्या दृष्टीने आणि खेळाडूंचा व्यग्र वेळापत्रक लक्षात घेत आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने टेनिसविश्वात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी टेनिस चाहत्यांना हक्काची विश्वचषक स्पर्धा मिळाल्याचा आनंद आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेची रूपरेषा बदलण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय महासंघाने घेतला. पुरूष टेनिसपटूंसाठी असलेल्या या स्पर्धेत पुढील वर्षापासून १८ देशांचा समावेश असून ही स्पर्धा वर्षाअखेरीस तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पात्रता फेरीचे सामने होतील आणि मुख्य स्पर्धा नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. याआधी डेव्हिस कप स्पर्धेचे सामने वर्षातून चार आठवडे खेळवण्यात येत होते. या फॉरमॅट बदलासाठी झालेल्या मतदानात ७१ % मत ही बाजूने पडली.
असा असेल नवा फॉरमॅट
२०१९ पासून फेब्रुवारीत होणाऱ्या पात्रता फेरीत २४ संघ होम - अवे स्वरूपात खेळतील आणि त्यातील १२ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. मागील वर्षांतील उपांत्य फेरीत प्रवेश कराणाऱ्या ४ संघांना मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळेल, तर उर्वरित दोन संघ वाइल्ड कार्डने सहभागी होतील. या १८ संघांची सहा गटांत विभागणी करण्यात येणार असून राऊंड रॉबिन प्रमाणे लढती होतील.
पहिली स्पर्धा केव्हा व कुठे?१८-२४ नोव्हेंबर २०१९ मध्ये ही स्पर्धा स्पेनच्या माद्रिद किंवा फ्रान्सच्या लिली शहरात खेळवण्यात येईल.