हालेपचा संघर्षपूर्ण विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:04 AM2018-05-31T03:04:59+5:302018-05-31T03:04:59+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला.
पॅरीस : जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पेट्रा क्विटोवाने लाला अरुआबारेनाला पराभूत करत तिसरी फेरी गाठली.
हालेपने फ्रेंच ओपनचे २०१४ व २०१७ मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत ८३ व्या स्थानी असलेल्या एलिसन रिस्कीने पहिला सेट २-६ असा घेतला. मात्र हालेपने आपला खेळ उंचावत २-६,६-१,६-१ अशा सेटने सामना जिंकला.
हालेप म्हणाली, ‘ग्रॅँडस्लॅमची पहिली फेरी नेहमीच कठीण असते. सुरुवातीला मी थोडी निराश होते.’ हालेपचा पुढील सामना अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड हिच्याशी होणार आहे. दरम्यान आठव्या मानांकित क्वितोवाने स्पेनच्या लारा अरुआबरेना हिला ६-०,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दोन वेळा विम्बल्डन विजेती असलेल्या क्विटोवाने क्ले कोर्टवर सलग १३ सामने जिंकले आहेत.
क्वितोवाने फ्रेंच ओपनपुर्वी प्राग व माद्रीद येथे झालेल्या स्पर्धेचे
जेतेपद पटकावले आहे. तिला
अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी एस्टोनियाच्या २५ व्या मानांकित एनेट कोंटाविटशी लढावे लागणार आहे.
युक्रेनच्या चौथ्या मानांकित एलिना स्वेतलानाने अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. एलिनाने स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरियाने कुजुमोवा हिला ६-३,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. फ्रेंच ओपनमध्ये दोन वेळा उपांत्य फेरी गाठणारी स्वेतलानाचा सामना आता रोमानियाच्या मिहिला बुजारनेस्कूशी होणार आहे.
जपानच्या २१ व्या मानांकित नाओमी ओसाकाने कजागिस्तानच्या झरीना डियासला ६-४,७-५ असे पराभूत करत पुढील फेरी गाठली. पुरुषांच्या गटात इटलीच्या मार्को सेसहिनातोने अर्जेंटिनाच्या मार्को टुंगेलिटीला ६-१,७-६,६-१ असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली.
केई निशीकोरीचा विजय
जापानच्या केई निशीकोरी याने फ्रान्सच्या बेनॉट पेअर याच्यावर ६-३,२-६,४-६, ६-२,६-३ असा विजय मिळवत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची पुढची फेरी गाठली आहे. या विजयासह निशीकोरी याने अंतिम ३२ मध्ये स्थान मिळवले आहे. २१ वे रँकिंग असलेल्या निशीकोरीला ५१ वे रँकिंग असलेल्या पेअर याने चांगलेच झुंजवले. जापानचा हा खेळाडू पहिल्या तीन पैकी दोन सेटमध्ये पराभूत झाला होता. मात्र त्यानंतर त्याने आपला अनुभव पणाला लावत अखेरचे दोन सेट जिंकत पुढची फेरी गाठली.
नोव्हाक जोकोविचने क्ले कोर्टवरील आपला दबदबा कायम राखला. त्याने ज्येईम मुनरचा ७-६,६-४,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. तो म्हणाला,’ प्रेरणाच अशा कठीण स्पेलमध्ये विजयासाठी महत्वाची असते. जुलैमध्ये ईस्टबॉर्न येथे झालेलया एटीपी टेनिस टूरचे जेतेपद त्याने जिंकले . डी इटालिया या स्पर्धेत त्याने क्ले कोर्टचा राजा राफेल नदाल याला कडवी झुंज दिली होती.