मेलबर्न - एकीकडे सर्व खेळाडू आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरणाशी झुंजत असताना दुसरीकडे, वयाच्या ३६ व्या वर्षी दिग्गज रॉजर फेडररने थेट जेतेपदाला गवसणी घालत सर्वांना तंदुरुस्ती कशी राखावी, याचा धडाच दिला. या शानदार जेतेपदानंतर आता फेडरर निवृत्ती घेणार की आणखी खेळत राहणार, असा प्रश्न सर्वांना पडला असताना खुद्द फेडररनेच ‘मला स्वत:लाच माहीत नाही की मी कधीपर्यंत टेनिस खेळत राहीन,’ असे सांगत सर्वांच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला. गेल्या वर्षी स्पेनचा दिग्गज राफेल नदालला नमवून आॅस्टेÑलियन ओपन पटकावलेल्या फेडने यंदा मरिन सिलिचला धक्का देत बाजी मारली. जागतिक टेनिसवर कधीपर्यंत दबदबा राखणार, असे विचारल्यावर फेडने म्हटले, ‘मला नाही माहीत. प्रमाणिकपणे सांगायचे झाल्यास याबाबतीत मला काहीच कल्पना नाही. गेल्या १२ महिन्यांत मी ३ ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. मला स्वत:वर विश्वास बसत नाही. माझ्यातील विजयाची भूक अजून संपलेली नाही.’ वयाच्याबाबतीत फेडरर म्हणाला, ‘वयाचा कोणताही अडथळा राहत नाही. वय केवळ एक आकडा आहे. पण मला विचारविनिमय करून माझ्या प्राथमिकतेला महत्त्व देत खेळायचे आहे.’त्याचप्रमाणे, ‘मी प्रत्येक स्पर्धा खेळू शकत नाही. पण मला सरावात आणि प्रवासामध्ये मजा येते. माझ्याकडे खूप चांगला संघ असून त्यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे,’ असेही फेडररने म्हटले. (वृत्तसंस्था)माझे आई - वडील माझ्यावर गर्व करतात हे पाहून खूप अभिमान वाटतो. स्पर्धेला त्यांचे येणे पाहून खूप चांगले वाटते. यामुळे मला आणि माझा खेळ उंचावण्यासाठी प्रेरणा मिळते.- रॉजर फेडरर
मी कधीपर्यंत खेळेल माहीत नाही - रॉजर फेडरर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:29 AM