भारताला एकेरीतील उत्कृष्ट खेळाडूंची गरज - विजय अमृतराज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:20 AM2018-09-24T02:20:03+5:302018-09-24T02:20:22+5:30
भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.
चेन्नई - भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.
भारताचा नुकताच विश्व डेव्हिस प्ले आॅफ लढतीत सर्बियाकडून ०-४ ने पराभव झाला होता. या पराभवानंतर अमृतराज यांनी केलेले वक्तव्य सूचक असून, देशाचे लक्ष एकेरीत खेळाडू घडविण्यावर असायला हवे. आमच्याकडे चांगले एकेरीचे खेळाडू असायला हवेत. दुहेरीत खेळाडू कितीही चांगले असले तरी काही अर्थ नाही. आमच्याकडे पुरेशा प्रमाणावर एकेरीचे खेळाङू नसल्याने आम्ही एलिट ग्रुपसाठी पात्र ठरत नाही.’
भारत आता १८ संघाचा सहभाग असलेल्या डेव्हिस कप फायनलच्या पात्रता मोहिमेंतर्गत पुढील वर्षीच्या स्थानिक आणि विदेशी प्रकारासाठी खेळणार आहे. रामकुमार रामनाथन आणि यूकी भांबरी या खेळाडूंच्या कामगिरीवर अमृतराज म्हणाले,‘दोन्ही युवा खेळाडू चांगले खेळले, पण त्यांनी फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. यूकीने आतापर्यंत प्रभावी खेळ केला, पण त्याची समस्या अशी की तो वर्षभर खेळत नाही. त्याने फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला हवे. रामकुमारनेदेखील काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला, पण त्याच्यासोबतही फिटनेसची समस्या कायम असल्याचे अमृतराज यांनी सांगितले.
अलीकडे तामिळनाडू टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले अमृतराज पुढे म्हणाले,‘टेनिसपटूंनी इतके फिट असायला हवे की १५ व्या चेंडूपर्यंत रॅली चालली तरी त्याने पहिल्या चेंडूइतकाच वेग कायम राखायला शिकले पाहिजे.’ (वृत्तसंस्था)