इंडियन वेल्स एटीपी: रॉजर फेडरर, राफेल नदाल सुसाट...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:55 AM2019-03-14T03:55:46+5:302019-03-14T03:56:03+5:30
जोकोविच, ओसाका यांचे आव्हान संपुष्टात
इंडियन वेल्स (अमेरिका) : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स स्पर्धेत आगेकूच करताना आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाला पराभूत केले. यासह त्याने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. स्पेनचा स्टार राफेल नदालनेही विजयी घोडदौड करताना चौथी फेरी गाठली. त्याचवेळी, नोव्हाक जोकोविच व नाओमी ओसाका या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूंचा तिसऱ्या फेरीतच पराभव झाला.
फेडररने देशबांधव वावरिंकाविरुद्धचे आपले वर्चस्व सिद्ध करताना विजयाचा रेकॉर्ड २२-३ असा केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात फेडररने आक्रमक खेळ करीत ६-३, ६-४ असा दिमाखदार विजय मिळवला. यासह फेडररने या स्पर्धेचे विक्रमी सहावे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. पुढील फेरीत त्याचा सामना ब्रिटनच्या कायले एडमंडविरुद्ध होईल.
त्याचवेळी, पावसामुळे सोमवारी थांबविण्यात आलेल्या सामन्यात मंगळवारी जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरने सनसनाटी निकाल नोंदवत जोकोविचला ६-४, ६-४ असे नमविले. बिगरमानांकीत फिलिपने अप्रतिम नियंत्रण राखताना कसलेल्या जोकोविचला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. त्याच्या जोरदार फटक्यांपुढे जोको पूर्णपणे हतबल झाला.
त्याचप्रमाणे महिलांमध्येही अनपेक्षित निकालाची नोंद झाली. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचनेदेखील सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. गेल्या
वर्षी ओसाकाने या स्पर्धेचे जेतेपद उंचावले होते. (वृत्तसंस्था)