केवळ ५ महिन्यांत सानियाने घटवलं २२ किलो वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:05 AM2019-03-28T01:05:48+5:302019-03-28T01:06:02+5:30
तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही.
मुंबई : तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. अनेक सेलिब्रिटींची तंदुरुस्ती पाहून आपण वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित होतो खरे; परंतु त्यांचे डाएट फॉलो करणे सर्वांना शक्य असेलच असे नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टिप्स घेऊ शकता. एका वृत्तपत्राने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ ५ महिन्यांमध्येच २२ किलो वजन कमी केले आहे.
गरोदरपणात सानियाचे वजन फार वाढले होते आणि हे वजन कमी करणे तिच्यासाठी आव्हान होते. परंतु बाळंतपणानंतर ५ महिन्यांमध्येच तिने वजन कमी करण्यात यश मिळविले. गरोदरपणात सानियाचे वजन ८९ किलो होते. बाळंतपणानंतर १५ दिवसांनी तिने व्यायाम करण्यास सुरुवात केली.
यामुळे सानिया सर्व मातांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ती आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ #momohustles या हॅशटॅगसह पोस्ट करते. याबाबत तिने सांगितले की, ‘यामागील कारण म्हणजे, आई झाल्यावरही तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. हा संदेश मला इतर महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे.’
सानियाने गरोदरपणामध्येही स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रीनेटल योगचा आधार घेतला आणि वर्कआउटही सुरू ठेवलं. सानिया आपल्या वाढलेल्या वजनाने खूश नव्हती. एका मुलाखतीमध्ये तिने म्हटले होते की, ‘मी टेनिस खेळत असो किंवा नसो. परंतु जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहते त्या वेळी मी पहिल्यासारखी अजिबात वाटत नाही.’ सानिया खाण्याची शौकीन आहे. मात्र बाळंतपणानंतर तिने आपल्या डाएटचे अगदी काटेकोरपणे पालन केले.
योगाचाही परिणाम
सानिया दररोज जिममध्ये ४ तास व्यायाम करते. याव्यतिरिक्त १०० मिनिटांसाठी कार्डिओ, एका तासासाठी किक बॉक्सिंग आणि पिलाटेचंही ट्रेनिंग घेते. या सर्व एक्सरसाइज व्यतिरिक्त सानियाने योगाचाही दैनंदिन वेळापत्रकामध्ये समावेश केला होता. त्यामुळेच वजन कमी करण्यात यशस्वी ठरलेली सानिया आता अधिक तंदुरुस्त दिसत आहे.