लावेर कप टेनिस : टीम युरोपने मारली बाजी, दिग्गज रॉजर फेडररचा निर्णायक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:56 AM2017-09-26T02:56:37+5:302017-09-26T02:58:11+5:30
जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला.
प्राग : जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात फेडररने आपला सर्व अनुभव पणास लावताना किर्गियोसची झुंज मोडून काढली. युरोपने या लढतीवर एकहाती वर्चस्व राखताना विश्व संघाचा १५-९ असा पराभव केला.
यंदाच्या वर्षी आॅस्टेÑलियन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेल्या फेडररने पुन्हा एकदा आपल्या उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करताना टेनिसप्रेमींचे मन जिंकले. किर्गियोसविरुद्ध पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही फेडररने आपले नियंत्रण न गमावताना ४-६, ७-६, ११-९ असा रोमांचक विजय मिळवत यूरोप संघाला विजयी केले. त्याचवेळी, जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असलेल्या २२ वर्षीय किर्गियोसने अप्रतिम झुंज देताना १९ ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररला घाम गाळायला लावले.
सामन्याच्या अखेरच्या तिसºया दिवसाची युरोप संघाने ९-३ अशा आघाडीने सुरुवात केली. अंतिम दिवशी झालेल्या दुहेरी सामन्यात विश्व संघाच्या जॅक सोक - जॉन इसनर या जोडीने शानदार बाजी मारताना युरोप संघाच्या थॉमस बर्डिच - मारिन सिलिच या जोडीचा ७-६, ७-६ असा पाडाव केला. यासह विश्व संघाने आपली पिछाडी ६-९ अशी कमी करताना जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.
यानंतरच्या एकेरी सामन्यात अॅलेक्झांडर झ्वेरेवने विजय मिळवताना विश्व संघाच्या सॅम क्वेरीचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ असे परतावले. या जोरावर युरोप संघाचे जेतेपद जवळपास निश्चित झाले होते. परंतु, राफेल नदालच्या अनपेक्षित पराभवाने पुन्हा एकदा विश्व संघाने आपल्या जेतेपदाच्या आशा उंचावताना सामना अखेरच्या लढतीपर्यंत खेचला. मात्र, फेडररने विश्व संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. (वृत्तसंस्था)
इस्नरने आशा उंचावल्या पण...
जॉन इसनर याने दुहेरीतील चमकदार कामगिरीनंतर विश्व संघाला पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आणताना जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालला ७-५, ७-६ असा धक्का दिला.
राफाच्या या अनपेक्षित पराभवानंतर विश्व संघाने ९-१२ अशी भरपाई केली. यामुळे, किर्गियोस फेडररला धक्का देण्यात यशस्वी ठरला असता, तर विश्व संघाने युरोप संघाशी बरोबरी केली असती.
मात्र, फेडररला ते मान्य नव्हते आणि त्याने अखेरपर्यंत लढताना झुंजार खेळाचे प्रदर्शन करुन युरोप संघाला पहिले लावेर विजेतेपद जिंकून दिले.
निर्णायक सामन्यात फेडरर किर्गियोसविरुध्द सुरुवातीला अडखळला. पहिल्या सेटमध्ये झालेल्या माफक चुकांचा त्याला फटका बसला.
दमदार पुनरागमन करत फेडने किर्गियोसला दाबावाखाली आणत बाजी मारली.