माद्रिद ओपन : क्ले :फेडररचे विजयी पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:32 AM2019-05-09T04:32:51+5:302019-05-09T04:33:06+5:30
तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
माद्रिद : तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. केवळ ५२ मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने गास्केटचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला.
याआधी या स्पर्धेत फेडररने २००६, २००९ आणि २०१२ साली जेतेपद उंचावले होते. याआधी १२ मे २०१६ रोजी रोम येथे डॉमनिक थिएमविरुद्ध पराभूत झाल्यानंतर फेडरर तीन वर्षे क्ले कोर्टपासून दूर राहिला होता. ग्रास कोर्टवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने काही काळ क्ले कोर्टवर न खेळण्याचा निर्णय घेतला होता. या विजयासह फेडररने गास्केटविरुद्ध झालेल्या २१ लढतींपैकी १८ सामने जिंकले.
त्याचवेळी अन्य लढतीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचनेही सहज आगेकूच करताना केवळ ६५ मिनिटांमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा ६-४, ६-२ असा पराभव केला. या स्पर्धेत जोकोविचने २०११ आणि २०१६ साली जेतेपद पटकावले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपन
स्पर्धेत बाजी मारून सलग
चौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने जोकोविच खेळत आहे. (वृत्तसंस्था)
महिलांमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात स्पेनच्या सारा सोरीबस टोर्मोचा ७-६, ३-६, ६-० असा पाडाव केला. दुसरा सेट जिंकून साराने सामना बरोबरीत आणत सर्वांना धक्का दिला. मात्र, यानंतर कसलेल्या ओसाकाने साराला एकही गेम जिंकण्याची संधी न देता सहज बाजी मारली. तिसºया मानांकित सिमोना हालेपनेही अपेक्षित आगेकूच करताना योहाना कोंटाचे आव्हान ७-५, ६-१ असे संपुष्टात आणले.